नवी दिल्ली : टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T 20 World Cup ) मोहिमेसाठी अमेरिकेत दाखल झाली आहे. भारतीय संघाची पहिली लढत 5 जूनला होणार आहे. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात 1 जूनला सराव सामना होणार आहे. भारतानं 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. भारताला पहिल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा विजेतेपद मिळवता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा माजी खेळाडू वासिम जाफरनं मोठं वक्तव्य केलं. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये जाफरनं बदल सुचवले आहेत. रोहित शर्मानं डावाची ओपनिंग करु नये त्याऐवजी विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालकडे ओपनिंगची जबाबदारी द्यावी, असं त्यानं सांगितलं आहे.
वासिम जाफर काय म्हणाला?
भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरच्या मते टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालनं करावी. रोरित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फलंदाजी करावी. रोहित शर्मा स्पिन गोलंदाजी चांगली खेळू शकतो त्यामुळं त्यानं चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यास हरकत नसावी, असं वासिम जाफरनं म्हटलंय. वासिम जाफरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे.
वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले असून प्रत्येकी पाच संघांचे चार गट करण्यात आले आहेत.
भारत, पाकिस्तान यांना यावेळी देखील एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड आणि कॅनडा एकाच गटात आहेत.
भारत पाकिस्तान हायव्होल्टेज लढत 9 जूनला
भारत आणि आयरलँड यांच्यातील मॅच 5 जूनला पार पडेल. यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लागलेली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 9 जूनला होणार आहे.
भारताला गेल्या दहा वर्षांपासून एकाही आयसीसीच्या स्पर्धेत विजेतेपद मिळालेलं नाही. भारतानं 2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारतीय संघाची आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपदाची पाटी कोरी राहिली आहे. भारतानं अनेकदा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक दिली मात्र त्यानंत विजेतेपद मिळवता आलं नव्हतं.
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं आव्हान सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये संपलं होतं. तर, भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केलं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावण्याची भारतीय संघाकडे संधी चालून आली आहे.
टी20 विश्वचषकात विराटच किंग, सर्वाधिक धावा कोहलीच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण कोण?