Rishabh Pant, T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकाला अवघे बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 शिलेदार विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय खेळाडू अमेरिकेत दाखल झाले असून सरावालाही सुरुवात केली आहे. ऋषभ पंत यालाही विश्वचषकाचे तिकिट मिळालेय. तब्बल दीड वर्षानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. आयपीएलमध्ये त्यानं दमदार कमबॅक केले. त्यानंतर त्याला विश्वचषकाचेही तिकिट मिळाले. 


ऋषभ पंत याचं कमबॅक टीम इंडियासाठी फायद्याचं ठरणार आहे. मधल्या फळीत टीम इंडियाला विश्वासू आणि अनुभवी डावखुरा फलंदाज मिळणार आहे. त्याशिवाय विकेटच्या मागेही त्याची कामगिरी शानदार राहिली. आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत यानं दिल्लीच्या संघाची धुरा संभाळली होती. त्यानं या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. पंतनं या हंगामात 155.40 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 446 ठोकल्या. ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. विश्वचषकाची तयारी करणाऱ्या ऋषभ पंत याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


ऋषभ पंत याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रिषभ पंतला म्हणाला  की, “त्या दिवसापासून हृदयात एक तळमळ बाकी आहे. स्वत:च्या पायावर उभा राहिलोय पण भारतासाठी पुन्हा उभं राहणं अजून बाकी आहे.”  पंतच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.






यंदाचा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दोन जूनपासून विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाच जून 2024 रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारतीय संघ त्यांचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याची क्रिकेटचे चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. भारतीय संघात दिग्गजांचा भरणा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह यासारखे अनुभवी खेळाडू आहे. त्यांच्या जोडीला ऋषभ पंत, यशस्वी जायस्वाल यासारखे अनुभवी खेळाडूही आहेत.