T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) उपांत्य फेरीसाठी चार संघ मिळाले आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांनी उपांत्य फेरीत स्थान पटकावलं आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनूसार 27 जून रोजी सकाळी 6 वाजता खेळवण्यात येईल. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान (South Africa vs Afganistan) यांच्यात हा सामना रंगणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्या होणार आहे. भारतीय वेळेनूसार 27 जून रोजी रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या...
यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनला संधी मिळेल का?
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली उपांत्य फेरीच्या सामन्यातही डावाची सुरुवात करू शकतात. मात्र, विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. या स्पर्धेत त्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी उपांत्य फेरीत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवू शकतो. अशा स्थितीत यशस्वी जैस्वाल यांना पुन्हा एकदा बाकावर बसावे लागू शकते. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे. यानंतर आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी येईल. शिवम दुबे पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. अशा स्थितीत संजू सॅमसनलाही बाकावर बसावे लागणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीची धुरा सांभाळता दिसेल.
रोहित पुन्हा तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो-
फिरकी विभागात पुन्हा एकदा रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे त्रिकूट अॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. याचे कारण म्हणजे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फलंदाजीमध्ये संघासाठी मोठं योगदान देऊ शकतात. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी करताना दिसणार आहेत. या दोघांना साथ देण्यासाठी हार्दिक पांड्याही संघात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
उपांत्य फेरीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?
काही वेगळे करायचे नाही. त्याच पद्धतीने खेळायचे आहे आणि प्रत्येकाला काय करायचे आहे ते समजून घ्यायचे आहे. मोकळेपणाने खेळा आणि पुढे काय आहे याचा जास्त विचार करू नका. विरोधी संघाचा विचार करू नका, आम्हाला ते करत राहावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीबद्दल रोहित म्हणाला, हा एक चांगला सामना असेल, एक संघ म्हणून आमच्यासाठी काहीही वेगळे होणार नाही, असं रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला.