T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतच्या प्रवासातील ऐतिहासिक कामगिरी करताना टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. अफगाणिस्तानने बांगलादेशवर डकवर्थ लुईस नियमानुसार 8 धावांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचे आव्हानही संपुष्टात आणले. 


अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचण्यामागे भारताचं देखील महत्वाचं योगदान आहे. कारण एकदिवसाआधी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला नसता, तर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहचणं शक्य नव्हतं. याचपार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह त्याचा फोटो आहे. या स्टोरीसह राशिद खानने मुंबईहून माझा मित्र आला आहे...असं म्हटलं आहे. तसेच ये दोस्ती, हम नहीं तोड़ेंगे, हे गाणं वापरलं आहे. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात रोहित शर्माने विशेष योगदान दिले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.






अफगाणिस्तानने प्रथमच उपांत्य फेरी गाठली-


2024 पूर्वी अफगाणिस्तानने 6 वेळा टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र आतापर्यंत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता, मात्र 2024 मध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून, पहिल्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हे दोन्ही संघ आजपर्यंत T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे यंदा 2024 च्या टी-20 विश्वचषकात जगाला नवा चॅम्पियन मिळण्याची शक्यता आहे.


विजयाची घोडदौड कायम ठेवली-


टी-20 विश्वचषकात सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात होता. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा, पापुआ न्यू गिनीआ आणि ऑस्ट्रेलियाता पराभव केला होता. आज हीच विजयी घोडदौड कायम ठेवत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने एका दगडात दोन शिकार केल्याचं बोललं जात आहे. आता अफगाणिस्तानचा संघ 26 जून रोजी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.


राशिद खान विजयानंतर काय म्हणाला?


सामन्यानंतर बोलताना राशिद म्हणाला की, आम्ही आमच्या मायदेशात परतल्यावर जोरदार जल्लोष करू. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. मला याबद्दल बोलण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत. ब्रायन लारा हा एकमेव जाणकार होता ज्याने अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल असे सांगितले होते. आम्ही त्याला भेटलो आणि तुझ्या शब्दांवर आम्ही खरे उतरू असे सांगितले होते. जे आत सत्यात उतरले आहे. आज अखेर आमचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: 10 वाजता मैदानातच लोळत पडला, चालताही येईना, 10.30 वाजता पळ पळ पळाला, गुलबदीन नईबच्या ॲक्टिंगने 'ऑस्कर'लाही लाजवलं!


T20 World Cup 2024 AFG vs BAN: ते एकमेव व्यक्ती म्हणाले, आम्ही सेमी फायनल गाठू; आम्ही भेटलो, शब्द दिला अन् आज...; राशिद खान काय म्हणाला?


T20 World Cup 2024 AFG vs BAN: हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले कांगारु, Video