T20 World Cup 2024 Sandeep Lamichhane: नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेचे (Sandeep Lamichhane) टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. अमेरिकेने संदीपला दुसऱ्यांदा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. नेपाळने T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला तेव्हा संदीप बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात होता. मात्र आता न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात क्लीनचिट दिली आहे. पण तरीही त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळाला नाही.


बलात्कार प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर संदीप आता अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संदीपने अमेरिकेला व्हिसासाठी अर्ज केला, मात्र नेपाळमधील अमेरिकन दूतावासाने त्याचा व्हिसा नाकारला.


पहिल्यांदा व्हिसा नाकारण्यात आलेल्या संदीपने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. संदीपने लिहिले, "आणि यूएस दूतावासाने पुन्हा तेच केले जे त्यांनी 2019 मध्ये केले, त्यांनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी माझा व्हिसा नाकारला. नेपाळ क्रिकेटच्या सर्व हितचिंतकांना मी दिलगीर आहे."


दुसऱ्यांदा व्हिसा नाकारला-


संदीपला व्हिसा मिळावा यासाठी दुसऱ्यांदा सरकार आणि नेपाळ क्रिकेटनेही हस्तक्षेप केला होता. मात्र त्यानंतर संदीपला अमेरिकेचा व्हिसा देण्यात आला नाही.


8 वर्षांची शिक्षा होती, त्यानंतर निकाल उलटला-


काठमांडू जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीपला आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण त्यानंतर पाटण उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पॅनेलने काठमांडू जिल्हा न्यायालयाचा निर्णय फेटाळण्याचा निर्णय दिला. अशाप्रकारे संदीपची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.


संदीप लामिछानेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-


23 वर्षीय संदीपने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 51 एकदिवसीय आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 18.07 च्या सरासरीने 112 विकेट्स घेतल्या आहेत आणि 35 डावांमध्ये फलंदाजी करताना 376 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये त्याने 12.58 च्या सरासरीने 98 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करताना 19 डावात 64 धावा केल्या.


सतराव्या वर्षी आयपीएल खेळण्याची संधी


संदीप लामिछानेनं 17 व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता.  दिल्लीच्या संघानं 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत. 


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या