IND vs PAK T20 World Cup : विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव करत सुपर 8 च्या दिशेने पाऊल टाकलेय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावांतच ऑलआऊट झाला. त्यात 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून शानदार सुरुवात झाली. भारताच्या विजायाची शक्यता फक्त 8 टक्के असल्याचं सांगितलं जात होतं. पण भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या 8 षटकात सामना फिरवला. जसप्रती बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह यांनी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत सामना फिरवला. जसप्रीत बुमराहने 15 व्या षटकात मोहम्मद रिझवान याचा त्रिफाळा उडवत पाकिस्तानच्या जबड्यातून मॅच माघारी आणली. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
सामन्याचा टर्निंग पॉइंट
120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह यानं बाबर आझम याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला अनुभवी मोहम्मद रिझवान तळ ठोकून उभा होता. त्यानं आपला अनुभव पणाला लावत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेलं होतं. दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या, पण रिझवान चिवट फलंदाजी करत होता. पाकिस्तानला 48 चेंडूत फक्त 48 धावांची गरज होती. सामना पाकिस्तान जिंकणार असेच सर्वांना वाटत होतो. पण 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने रिझवानचा त्रिफाळा उडवला अन् भारताच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. रिझवानची विकेट हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, सामना फिरवला..
120 धावांचा पाठलाग करणं न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर सोपं नव्हतं. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. बाबर आझम लवकर तंबूत परतला. पण रिझवान यानं डाव सावरला होता. पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत 48 धावांची गरज होती, आठ विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान आणि फखक जमान हे अनुभवी फलंगदाज मैदानात होते. हार्दिक पांड्याने 13 व्या षटकात फखर जमान याचा अडथळा दूर केला. त्यानंतर 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह यानं मोहम्मद रिजवान याचा त्रिफाळा उडवला. मोहम्मद रिजवान 44 चेंडूत 31 धावांवर खेळत होता. तो लयीत होता, अनुभवाच्या जोरावर सामना केव्हाही फिरवण्याची त्याची क्षमता होती. बुमराह याने रिझवान याला तंबूत पाठवत भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर सादाब खान, इफ्तिखार अहमद आणि इमाद वासीम यांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. त्यात खूप निर्धाव चेंडू गेले. परिणाणी अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजायासाठी 17 धावांची गरज होती. अर्शदीप सिंह यानं 11 धावा खर्च करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केे.
भेदक मारा, पाकिस्तानचे फलंदाज चारीमुंड्या चीत -
भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला. जसप्रीत बुमराह यानं चार षटकात फक्त 14 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. बुमराहने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांना बाद केले. हार्दिक पांड्याने चार षटकात 24 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.