T20 World Cup 2024 IND vs BAN: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आज सुपर 8 फेरीत भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना रंगणार आहे. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आज भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. 


बांगलादेशविरुद्धच्या आजच्या सामन्यात भारतीय संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्ध विश्रांती दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, विराट कोहलीवर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करू शकतात. अष्टपैलू खेळाडू फलंदाज शिवम दुबे तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे.


बुमराहला विश्रांती देणार?


जसप्रीत बुमराहला विश्रांती देणार असल्याचं सांगितले जात आहे. मात्र बांगलादेविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळणं कठीण आहे. कारण उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित आपल्या मजबूत संघालाच मैदानात उतरवू शकतो. शिवम दुबेलाही अंतिम अकरामध्ये आणखी एक संधी मिळू शकते. मधल्या फळीबद्दल बोलायचे झाले तर, जगातील नंबर वन टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या मॅच फिनिशर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांवर वेगाने धावा करण्याची जबाबदारी असेल.


सिराजचे परतणे अवघड


फिरकी विभागात रोहित शर्मा पुन्हा एकदा अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर अवलंबून राहू शकतो. गरज भासल्यास अक्षर आणि जडेजाही फलंदाजीने योगदान देऊ शकतात आणि दोघेही चांगली फिरकी गोलंदाजी करतात. तर वेगवान गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह भेदक गोलंदाजीचा मारा करताना दिसतात. दोघांना हार्दिक पांड्याची साथही लाभेल. 


बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.