T20 World Cup 2024 SA vs ENG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय होता, त्यामुळे उपांत्य फेरीत जाणे जवळपास निश्चित झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. 11 व्या षटकात 4 विकेट्स गमावत 61 धावा असताना इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या 78 धावांच्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात पुनरागमन केले. लिव्हिंगस्टोनने 17 चेंडूत 33 धावा केल्या, तर ब्रुकने 37 चेंडूत 53 धावा केल्या.
शेवटच्या दोन षटाकांत सामना फिरला-
प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 163 धावा केल्या. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्यात 86 धावांची सलामीची भागीदारी झाली. एकेकाळी आफ्रिका 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण मधल्या षटकांत संघाने केवळ 52 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 38 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 65 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 28 चेंडूत 43 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 163 पर्यंत नेण्यात मोठे योगदान दिले.
पहिल्या 10 षटकांत इंग्लंडचा डाव फसला
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला, पण 8 चेंडूत केवळ 11 धावा करून फिलिप सॉल्ट बाद झाला तेव्हा चौकार-षटकारांचा पाऊस सुरू झाला नव्हता. केशव महाराजने जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली तेव्हा स्कोअरबोर्डवर 50 धावाही नव्हत्या, त्याने 20 चेंडूत 16 धावा केल्या. महाराजांनी पुढच्याच षटकात कर्णधार जॉस बटलरची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिल्याने विकेट पडण्याचा टप्पा सुरू झाला होता. बटलरला 20 चेंडूत केवळ 17 धावा करता आल्या. मोईन अलीही काही खास दाखवू शकला नाही, ज्याच्या बाद झाल्यामुळे इंग्लंडने 61 धावांत 4 विकेट गमावल्या.
लिव्हिंगस्टोन-ब्रूकने उत्साह वाढवला, पण...
10 षटकांनंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडची धावसंख्या 14 षटकात 4 विकेट गमावत 87 धावा होती. ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनने 15 व्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून पुढच्या 3 षटकात 52 धावा केल्या आणि त्याच दरम्यान ओटनील बार्टमनने त्याच्या षटकात 21 धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या 3 षटकात केवळ 25 धावा करायच्या होत्या. या दोन फलंदाजांनी सामन्यात उत्साह वाढवला होता. पण शेवटी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली.
सामना कुठे फिरला?
18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडाने लिव्हिंगस्टोनची विकेट घेतल्यावर सामन्याला कलाटणी मिळाली. लिव्हिंगस्टोनने 33 धावा केल्या, पण तरीही इंग्लंडच्या आशा हॅरी ब्रूकवर टिकून होत्या. परंतु उर्वरित काम मार्को जॅनसेनने 19 व्या षटकात पूर्ण केले कारण त्याने षटकात केवळ 7 धावा दिल्या. ॲनरिक नॉर्टजेला बचावासाठी शेवटच्या षटकात 14 धावा होत्या, पण त्याने पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकला बाद करून इंग्लंडला बॅकफूटवर आणले. सॅम कुरनने चौकार मारला, पण त्याला साथ द्यायला कुणी चांगला फलंदाज नव्हता. त्यामुळे 18व्या आणि 19व्या षटकात सामना आफ्रिकेच्या बाजूने वळला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.