T20 World Cup 2024 किंग्जटाऊन : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) बांगलादेश विरुद्ध नेदरलँड (BAN vs NED) यांच्यात मॅच सुरु आहे. बांगलादेशनं नेदरलँड पुढं विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशचा सलामीवीर तंजिद हसननं चांगली कामगिरी करत 35 धावा केल्या. मात्र, तंजिद हसन मोठ्या संकटातून वाचला. किंग्जटाऊनच्या अर्नोस वेल ग्राऊंडवर सुरु असलेल्या मॅचमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. नेदरलँडचा गोलंदाज विवियन किंगमा याचा बाऊन्सर तंजिद हसनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. विशेष म्हणजे बॉल थेट हेल्मेट आणि त्याच्या ग्रिलमध्ये अडकल्यानं हसन थोडक्यात बचावला. हसननं हेल्मेट काढल्यानंतर देखील बॉल तसाच अडकेला होता.
पाहा व्हिडीओ
हा सर्व प्रकार बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये घडला. विवियन किंगमा याच्या बाऊन्सरवर तंजिद हसननं पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला आणि बॉल थेट त्याच्याकडे आला. बॉलला अधिक वेग असल्यानं हसन चूकला.किंगमानं टाकलेला बॉल थेट हसनच्या हेल्मेटमध्ये घुसला. हसननं तातडीनं हेलमेट काढून टाकलं. मात्र, बॉल लगेचेच निघाला नाही.
हेल्मेट मध्ये बॉल अडकल्यानंतर वैद्यकीय पथक मैदानात दाखल झालं. त्यांनी तंजिद हसनची तपासणी केली. तंजिद हसनला दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यानं खेळण्यास पुन्हा सुरुवात केली.
नेदरलँडचा कॅप्टन स्कॉट एडवर्डनं बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये शर्यत आहे. श्रीलंकेचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर गेलेला आहे.
बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 159 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून सर्वाधिक 64 धावा शाकिब उल हसन यानं केल्या. तंजिद हसननं 35 धावा केल्या. नेदरलँडकडून पॉल वॅन मीकरन आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नेपाळचा संघ देखील या गटात आहे. मात्र, त्यांचा एक सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.
संबंधित बातम्या :