T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघानं आपपल्या उत्कृष्ट संघाची निवड केलीय. यापूर्वी टी-20 विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत नजर टाकुयात. या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल टॉपवर आहे. त्यानं टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन शतक झळकावली आहेत. तर, या यादीत भारताचा एकमेव फलंदाज सुरेश रैनाचं नाव आहे. त्यानं 2010 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 60 चेंडूत 101 धावांची खेळी केली होती. ज्यात 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. 

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ख्रिस गेल दोन शतकांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सुरेश रैना (भारत), महेला जयवर्धने (श्रीलंका), ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड), एलेक्स हेल्स (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड), अहमद शहजाद (पाकिस्तान) आणि तमीम इक्बाल (बांग्लादेश) यांनी टी-20 विश्वचषकात प्रत्येकी एक-एक शतक झळकावलं आहे. महत्वाचं म्हणजे,  ख्रिस गेलनंतर कोणत्याही फलंदाजाला टी-20 विश्वचषकात दोन शतक करता आली नाहीत.

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक शतक करणारे फलंदाज-

क्रमांक फलंदाज देश शतक
1 ख्रिस गेल वेस्ट इंडीज 2
2 सुरेश रैना भारत 1
3 महेला जयवर्धने श्रीलंका 1
4 ब्रेंडन मॅक्युलम न्यूझीलंड 1
5 एलेक्स हेल्स इंग्लंड 1
6 जोस बटलर इंग्लंड 1
7 अहमद शहजाद पाकिस्तान 1
8 तमीम इक्बाल बांग्लादेश 1

 

ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषकातील सामने
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा-
IND vs WA XI: आर.अश्विन, हर्षल पटेलची भेदक गोलंदाजी; टीम इंडियानं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला 162 धावांवर रोखलं!