Ravi Shastri on Team India : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ही भव्य स्पर्धा रंगणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून सराव सामने खेळण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान यंदा भारताने उतरलेला टी20 विश्वचषकासाठीचा संघ हा टी20 वर्ल्डकप इतिहासातील भारताकडून उतरवण्यात आलेला सर्वात दमदार फलंदाज असणारा संघ असल्याची प्रतिक्रिया माजी क्रिकेटर आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिली आहे. मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


'या तीन खेळाडूंमुळे ताकद आणखी वाढली'


रवी शास्त्री यांनी आगामी विश्वचषकाबद्दल बोलताना भारतीय संघ यंदा अगदी अप्रतिम फलंदाजांसोबत मैदानात उतरत आहे. 2007 पासून भारत टी20 विश्वचषक खेळत असून आतापर्यंतच्या इतिहासात यंदाची बॅटिंग लाईन अप सर्वात दमदार असल्याचं शास्त्री म्हणाले. यामागील खास कारण म्हणजे, मधल्या फळीतील पंत, पांड्या आणि कार्तिक हे त्रिकुट असल्याचंही शास्त्री म्हणाले. या तिघांच्या संघात एकत्र असण्याने भारताची फलंदाजी अगदी दमदार झाल्याचं ते म्हणाले. 


विश्वचषकापूर्वी भारत खेळणार सराव सामने


विश्वचषक खेळणारे बहुतेक संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारत काही सराव सामने खेळणार आहे. भारत आज अर्थात 13 ऑक्टोबर रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ब्रिसबेन येथे जाईल, जिथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी अनुक्रमे 17 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला दोन अधिकृत सराव सामने खेळतील.


ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 



हे देखील वाचा-