Syed Mushtaq Ali Trophy 2022 Final: कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) मुंबई आणि हिमाचल प्रदेश (MUM vs HIM) यांच्यात आज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यातील निकालानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला नवा विजेता मिळणार आहे. 2007 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई आणि हिमाचल प्रदेशनं प्रथमच प्रवेश केलाय. उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईनं विदर्भाचा तर, हिमाचलनं पंजाबचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत दोन्ही संघानं आतापर्यंत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. मात्र, ट्रॉफी कोणाच्या हाती लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल. 


कधी, कुठं रंगणार सामना?
मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना आज  (5 नोव्हेंबर 2022 ) हिमाचल प्रदेश विरुद्ध मुंबई यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 4.30 वाजता सुरुवात होईल, यापूर्वी अर्धातास नाणफेक होईल. हिमाचलविरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. तसचे डिस्ने+ हॉटस्टारवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. तसेच या सामन्याशी संबंधित ताजी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


पंजाबला हरवून हिमाचलची फायनलमध्ये धडक
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात हिमाचल प्रदेशनं पंजाबचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात हिमाचलनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सात विकेट्स गमावून 176 धावा केल्या. हिमाचलकडून सुमित वर्मानं सर्वाधिक 51 धावा केल्या. आकाश वशिष्ठनं 53 आणि पंकज जैस्वालनं 27 धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून अभिषेक शर्मा आणि सनवीर सिंहने प्रत्येकी दोन- दोन विकेस् मिळवले. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला निर्धारित 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 163 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून शुभमन गिलनं सर्वाधिक 45 धावा केल्या. अनमोलप्रीत सिंहनं 30 धावा केल्या. कर्णधार मनदीप सिंह आणि रमणदीप सिंह यांनी प्रत्येकी 29 धावांचं योगदान दिलं . हिमाचलचा कर्णधार ऋषी धवननं तीन बळी घेतले. त्याचवेळी मयंक डागरने दोन गडी बाद केले.


विदर्भाला नमवून मुंबईचा संघ फायनलमध्ये दाखल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईनं विदर्भाचा पाच विकेट्स राखून धुव्वा उडवला. श्रेयस अय्यर मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भानं सात गडी गमावून 164 धावा केल्या. विदर्भकडून जितेश शर्मानं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. वानखेडेनं 34 तर अथर्वनं 29 धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीनं तीन विकेट्स घेतल्या. तर, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन विकेट्स जमा झाल्या. प्रत्युत्तरात मुंबईनं 3 षटक 1 चेंडू राखून हा सामना जिंकला. मुंबईकडून श्रेयस अय्यरनं सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याचवेळी पृथ्वी शॉनं 34 आणि सर्फराज खाननं 27 धावा केल्या. विदर्भाच्या दर्शन नळकांडे आणि अक्षय कर्नावार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-