Suryakumar Yadav PC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याची टी 20 मालिका सुरु होणार आहे. विशाखापट्टणममध्ये हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यापूर्वीच भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद पार पडली. पण या पत्रकार परिषदेला फक्त दोन पत्रकार आल्याचे समोर आलेय. तर ही पत्रकार परिषद फक्त साडेतीन मिनिटांत संपली. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


जिओ सिनेमाने सूर्यकुमार यादवच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओही 3.32 मिनिटांचा आहे. सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद संपल्यानंतर एका पत्रकाराने ट्वीट करत फक्त दोन पत्रकार आल्याची माहिती दिली होती. त्याशिवाय साडेतीन मिनिटं पत्रकार परिषद चालल्याची माहितीही दिली होती. 
 






पत्रकार परिषदेत सूर्या काय म्हणाला ?


पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्यासाठी वेळ लागेल. त्यायाशिवाय पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, या विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून उदाहरण दिले. या विश्वचषकात रोहित शर्माने जे काही केले ते पूर्णपणे वेगळे होते. त्याला जे सांगितले होते ते त्याने केले. संघाच्या बैठकीत जे काही बोलले गेले ते मैदानावर केले. कर्णधार या नात्याने त्याने उदाहरण देऊन नेतृत्व केले. विश्वचषकाबाबत सूर्या म्हणाला की, 2023 च्या विश्वचषकात आम्ही सर्वजण अभिमान वाटावे असे खेळलोत. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आज जेव्हा मी खेळाडूंना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा आपण नि:स्वार्थपणे जावे. आपल्या विक्रमांसाठी खेळू नये. मी नेहमीच संघासाठी वैयक्तिक रेकॉर्डचा विचार करत नाही.


2021 पासून सूर्या भारताच्या टी20 संघाचा नववा कर्णधार -


2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आठ खेळाडूंनी भारताच्या टी20 संघाची धुरा संभाळली आहे. सूर्यकुमार यादव या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या सुरुवातीला विराट कोहलीने 10 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर 2021 मध्ये शिखर धवन 3 सामन्यात, 2021-22 मध्ये रोहित शर्मा 32 सामन्यात, 2022 मध्ये ऋषभ पंत 5 सामन्यात, 2022-23 मध्ये हार्दिक पंड्या 16 सामन्यात, 2022 मध्ये केएल राहुल 11 सामन्यात कर्णधार होता. 2023 मध्ये जसप्रीत बुमराह 2 सामन्यांसाठी भारतीय T20 संघाची जबाबदारी स्वीकारली.  2023 मध्ये 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा या यादीतील नववा भारतीय कर्णधार असेल.