Australia vs India 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ॲडलेड मैदानावरील डे-नाईट कसोटीचा दुसरा दिवस अत्यंत वादळी ठरला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज ट्रॅव्हिस हेड या दोघांमध्ये मैदानावर झालेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने जवळपास 99 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 140 धावा केल्या होत्या. त्याच्या या शतकी खेळीमुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला निर्णायक आघाडी मिळाली. मात्र, ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजने केलेली कृती सध्या वादाचा विषय ठरत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यावरुन मोहम्मद सिराजला खडेबोल सुनावले आहेत. मोहम्मद सिराजला हिरो होण्याची संधी होती, पण तो व्हिलन झाला, असे गावसकर यांनी म्हटले.
सुनील गावसकर यांनी सिराजच्या कृतीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, अखेर तू असे का केलेस? सिराजकडे हिरो होण्याची संधी असताना तो व्हिलन झाला. 'ज्या स्थानिक खेळाडूने शतकी खेळी केली त्याच्याविरुद्ध असे वर्तन योग्य नव्हते. ट्रॅव्हिस हेड 5-10 धावा काढून बाद झाला नव्हता, तर त्याने 141 चेंडूत 140 धावा केल्या. हेडला बाद केल्यानंतर सिराजने शतकासाठी टाळ्या वाजविल्या असत्या तर मैदानावर उपस्थित चाहत्यांच्या नजरेत तो हिरो ठरला असता. पण शतकी खेळी करणाऱ्या स्थानिक हिरोविरुद्ध अशी कृती योग्य नव्हती', असे सुनील गावसकर यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला. 140 धावा कुटल्यानंतर तो मोहम्मद सिराजच्या अप्रतिम यॉर्कवर बोल्ड झाला. ट्रॅव्हिस हेडनेही सिराजच्या या चेंडूचे कौतुक केले. मात्र, सिराजला ट्रॅव्हिस हेड आपल्याला डिवचतोय, असे वाटले. त्यामुळे सिराजने चिडून हेडच्या दिशेने हातवारे केले. सिराजच्या या कृतीमुळे मैदानातील ऑस्ट्रेलियन प्रेक्षकही संतापले. त्यांनी सिराजची हुर्रे उडवली आणि ट्रॅव्हिस हेड पॅव्हेलियनमध्ये परतत असताना उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, या सामना संपल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने या वादाबाबत प्रतिक्रिया दिली. मी सिराजला, 'वेल बॉल' असे म्हटले. मात्र, त्याचा गैरसमज झाला. त्याने मला पॅव्हेलियनच्या दिशेने जाण्याचा इशारा केला तेव्हा माझ्याकडूनही त्याचप्रकारे प्रतिसाद दिला गेला. मोहम्मद सिराज ज्याप्रकारे वागला ते पाहून निश्चितच थोडेसे वाईट वाटले. त्यांना याप्रकारे वागायचे असेल आणि त्यांना अशाच प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तसेच होऊन जाऊ द्या, असे ट्रॅव्हिस हेडने म्हटले.
आणखी वाचा
टीम इंडिया पराभवाच्या छायेत! दुसऱ्या दिवशी अर्धा संघ तंबूत, ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी