नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी अॅडिलेडमध्ये सुरु आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ पराभवाच्या छायेत असल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे भारतीय संघ संकटात असताना भारतातून एक चांगली अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या दोन कसोटीसाठी उपलब्ध असल्याची अपडेट पीटीआयनं दिली आहे. त्यामुळं उर्वरित दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमी भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळतो का ते पाहावं लागेल.
मोहम्मद शमी गेल्या वर्षभरापासून संघातून बाहेर
भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मोहम्मद शमीनं गोलंदाजी केली होती. मोहम्मद शमी त्यानंतर दुखापतीमुळं संघाबाहेर होता. दरम्यानच्या काळात उपचार घेतल्यानंतर शमीनं काही दिवसांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालच्या संघाकडून सामने खेळले होते. मध्य प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये बंगालकडून खेळला होता. आता मोहम्मद शमी तंदुरुस्त असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळू शकतो, अशी अपडेट पीटीआयनं दिली आहे. त्यामुळं बीसीसीआयनं खरंच मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतल्यास रोहित शर्मा त्याला संघात स्थान देतो का पाहावं लागेल.
बुमराह अन् सिराजवर जबाबदारी
भारताच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्त्व सध्या जसप्रीत बुमराह करत आहे. बुमराह सोबत मोहम्मद सिराज देखील भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. याशिवाय हर्षित राणा देखील संघात आहे. आता मोहम्मद शमी संघात परतल्यास भारतीय गोलंदाजी आणखी आक्रमक होऊ शकते. त्यामुळं रोहित शर्माला देखील दिलासा मिळू शकतो. भारतानं वेगवान गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पहिल्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. पहिल्या कसोटीच्या तुलनेत दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं.
भारताच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह कायम?
पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघ 149 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी कमबॅक केलं होतं. यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांवर बाद झाला. तर, दुसऱ्या डावातही भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं 5 विकेटवर 128 धावा केल्या होत्या. रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी भारतीय संघाचा डाव सावरतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :