IND vs NZ : हनुमा विहारीला संघात स्थान का मिळालं नाही ? सुनील गावसकरांनी सांगितलं IPL चं कारण
Hanuma Vihari : विदेशात भारतीय संघाचा संकटमोचक ठरणाऱ्या हनुमा विहारीला संघात स्थान मिळालं नाही. यावर सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
Hanuma Vihari News : न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची निवड झाली. पहिल्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यरलाही कसोटी संघात स्थान देण्यात आलेय. पण, विदेशात भारतीय संघाचा संकटमोचक ठरणाऱ्या हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संघात स्थान मिळालं नाही. यावर सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीत दुखापतीनतरही भारतीय संघाच्या पराभवाच्या मध्ये उभा राहणारा हनुमा विहारीला निवड समितीनं डावललेय. यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना सुनील गावसकर यांनी आयपीएलमुळे हनुमा विहारीला भारतीय संघात स्थान न मिळाल्याचं सांगितलं. मागील चार महिन्यात हनुमा विहारी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळला नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही हनुमा विहारी खेळला नाही. त्यामुळेच कदाचीत भारतीय संघाची निवड करताना हनुमा विहारीच्या नावाची चर्चा झाली नसावी, असं सुनील गावसकर यांनी सांगितलं.
हनुमा विहाराला संघाबाहेर ठेवल्यामुळे निवड समितीला टीकेचा सामना करावा लागला. गावसकरांच्या मते, गेल्या काही महिन्यापासून विहारीनं क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. 2021 मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतही विहारी खेळताना दिसला नव्हता. त्यामुळे विहारी निवड समितीच्या नजरेतून बाहेर गेला असेल. याशिवाय आयपीएलमधील प्रदर्शन भारतीय संघाच्या निवड समितीवर प्रभाव पाडतेय. स्पोर्ट्स टुडेसोबत बोलताना गावसकर म्हणाले की, “विहारीची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे मी आर्श्चयचकित झालो नाही. कारण, गेल्या काही महिन्यापासून विहारी क्रिकेट खेळला नाही. आयपीएलमधूनही तो बाहेर आहे. त्यामुळे निवडसमितीनं त्याला नजरअंदाज केलं. दुसरीकडे निवड झालेल्या खेळाडूंबाबत बोलायचं झाल्यास, त्या सर्व खेळाडूंनी कोणत्या ना कोणत्या प्रकराचं क्रिकेट खेळलं आहे. हे गरजेचं नाही, की फक्त कसोटी क्रिकेटही खेळणं गरजेचं आहे. त्यामुळेच विहारीला संघात स्थान मिळालं नसेल.“
दरम्यान, हनुमा विहारीची निवड न केल्यामुळे टीका होत असलेल्या निवड समितीनं मोठा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अ संघामध्ये हनुमा विहारीची निवड केली आहे. प्रियांक पांचालच्या नेतृत्वात भारतीय अ संघ चार दिवसांच्या मालिकासाठी दक्षिण आफ्रिकामध्ये जाणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबर रोजी सरु होणार आहे. हनुमा विहारीने भारतासाठी 12 कसोटी सामने खेळले आहेत. यामधील 11 कसोटी सामने विदेशात आहेत. या सामन्यात एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीनं विहारीनं 624 धावा केल्या आहेत.