IND vs AUS : केएल राहुलसह स्टीव्ह स्मिथला तिसऱ्या वन-डे सामन्यात खास रेकॉर्ड करण्याची संधी, वाचा सविस्तर
Steve Smith and KL Rahul : स्टीव्ह स्मिथ वनडे कारकिर्दीत पाच हजार धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे, तर केएल राहुल देखील दोन हजार धावांचा टप्पा पूर्ण करु शकतो.
IND vs AUS, 3rd ODI : आज चेपॉक येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि केएल राहुल ( KL Rahul) यांना एक खास कामगिरी करण्याची संधी असेल. या सामन्यात, स्टीव्ह स्मिथ संयुक्तपणे ऑस्ट्रेलियासाठी 5000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज बनू शकतो. तसंच तिथे केएल राहुल देखील भारतीय संघासाठी 2000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा संयुक्त दुसरा सर्वात वेगवान खेळाडू बनू शकतो.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आहे अव्वलस्थानी
ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद पाच हजार वनडे धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने 115 डावांत हा आकडा गाठला आहे. अॅरॉन फिंच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फिंचने 126 डावात 5000 धावा पूर्ण केल्या असून स्टीव्ह स्मिथला देखील 126 डावात ही कामगिरी करण्याची संधी आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 141 एकदिवसीय सामन्यांच्या 125 डावात 4939 धावा केल्या आहेत. पाच हजार धावांपासून तो फक्त 61 धावा दूर आहे. स्टीव्ह स्मिथने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 44.90 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतकं आणि 29 अर्धशतकंही केली आहेत.
शिखर धवनने भारतासाठी पूर्ण केल्या आहेत जलद 2000 धावा
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने अवघ्या 48 डावात दोन हजार वनडे धावा केल्या. या बाबतीत तो अव्वलस्थानी आहे. त्याच्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू (52 डाव) आणि सौरव गांगुली (52 डाव) यांचा क्रमांक लागतो. केएल राहुलही आजच्या त्याच्या 52 व्या डावात हा आकडा पार करू शकतो. केएल राहुलने आतापर्यंत 53 वनडे सामने खेळले आहेत. त्याने 51 डावात 1954 धावा केल्या आहेत. म्हणजेच दोन हजार धावांपासून तो फक्त 46 धावा दूर आहे. केएल राहुलने या 51 डावांमध्ये 45.44 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतकं आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) हा तिसरा एकदिवसीय सामना (IND vs AUS 3rd) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
हे देखील वाचा-