World Cup 2023 : विश्वचषक हळू हळू उत्तरार्धाकडे झुकत आहे. पाकिस्तान, इंग्लंडसह काही संघाचे विश्वचषकातील आव्हानही जवळपास संपुष्टात आलेय. श्रीलंका संघाचीही स्थिती बिकट आहे. श्रीलंका संघाला पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी श्रीलंकेला पुढील सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. पण दुखापतीमुळे श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेचा तिसरा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. याआधी कर्णधार दासुन शनाका आणि वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना यांना दुखापत झाल्यामुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली होती. आता भन्नाट फॉर्मात असलेला लाहिरु कुमारा दुखापतग्रस्त झाला असून तो विश्वचषकातून माघार घेतली आहे. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. लाहिरु  कुमाराच्या जागी श्रीलंकेने दुशमंथा चमिरा याला 15 जणांच्या चमूमध्ये संधी दिली आहे. 


श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सोमवारी पुण्यात सामना होणार आहे. त्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान लाहिरु कुमारा याच्या डाव्या मांडीला दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागेल. कुमाराच्या जागी धुशमंथा चमिरा याला 15 जणांच्या चमूमध्ये संधी देण्यात आली आहे. आयसीसीच्या टेक्निकल कमिटीने या निर्णायाला मान्यता दिलाय. 


कुमाराची कामगिरी कशी राहिली ?


बेंगळुरुमध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यात लाहिरु कुमारा याने शानदार कामगिरी केली होती.  कुमारा याने मोक्याच्या क्षणी विकेट घेत श्रीलंकेच्या विजयाची वाट सूकर केली होती. कुमाराने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. लाहिरु  कुमारा याने आतापर्यंतच्या पाच सामन्यात श्रीलंकेसाठी आठ विकेट घेतल्या आहेत. कुमाराच्या अनुपस्थितीत श्रीलंका संघाला मोठा झटका बसलाय. वानखेडेच्या खेळपट्टीवर लाहिरु  कुमारा प्रभावी ठरला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन नोव्हेंबर रोजी वानखेडेवर सामना होणार आहे. त्याआधीच त्यांना हा मोठा झटका बसलाय. 


विश्वचषकात तिसरा धक्का - 


वनडे विश्वचषकात श्रीलंकेला हा तिसरा धक्का बसला आहे. याआधी कर्णधार दासुन शनाका आणि मथिशा पथिराना (खांद्याला दुखापत) यांना दुखापत झाली होती. त्यांच्याजागी अनुभवी अँजलो मॅथ्यूज चमिका करुनरत्ने यांना 15 जणांच्या चमूमध्ये स्थान दिले होते. आता लाहिरु कुमाराच्या जाही दुशमंथा चमिरा याला संधी देण्यात आली आहे. 






श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी ?


श्रीलंका संघाची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी सरासरी राहिली आहे. त्यांना पाच सामन्यात दोन विजय आणि तीन पराभवाचा सामना करावा लागलाय. श्रीलंका संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.  श्रीलंका संघाचे अद्याप चार सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलचे तिकिट मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल.


श्रीलंकेचे पुढील सामने कोणते ?


श्रीलंकेचा विश्वचषकातील पुढील सामना अफगाणिस्तानविरोधात होणार आहे. सोमवारी या दोन संघामध्ये लढत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना 2 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय . 6 नोव्हेंबर बांगलादेश, 9 नोव्हेंबर न्यूझीलंड यांच्याविरोधातही श्रीलंकेला दोन हात करायचे आहेत. 


Sri Lanka squad: Kusal Mendis (c), Kusal Perera, Pathum Nissanka, Dushmantha Chameera, Dimuth Karunaratne, Sadeera Samarawickrama, Charith Asalanka, Dhananjaya de Silva, Maheesh Theekshana, Dunith Wellalage, Kasun Rajitha, Angelo Mathews, Dilshan Madushanka, Dushan Hemantha, Chamika Karunaratne.