ENG vs IND, WC 2023 : लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताचा मिडिल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यरकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. अय्यरला वनडे क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या वेगवान दोन हजार धावा करण्याची संधी आहे. यासाठी अय्यरला फक्त 69 धावांची गरज आहे.


विश्वचषकात आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर दोन्ही संघ भिडणार आहे. या सामन्यात अय्यरने 69 धावांची खेळी केल्यास, तो शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. शिखर धवन याने 48 डावात वनडेमध्ये दोन हजार धावा चोपल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिखर धवन 11 व्या क्रमांकावर आहे.


श्रेयसच्या 47 डावात 1931 धावा - 


श्रेयस अय्यर याने डिसेंबर 2017 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने भारतासाठी 52 सामने खेळले आहेत. यामध्ये 47 डावात त्याने 45.97 च्या जबरदस्त सरासरीने आणि 97.42 च्या स्ट्राइक रेटने 1931 धावा केल्या आहेत. अय्यरच्या नावावर तीन शतके आणि 15 अर्धशतकांची नोंद आहे. अय्यरने दुखापतीनंतर जोरदार कमबॅक केले. विश्वचषकात तो चांगल्या लयीत दिसत आहे. आतापर्यंत पाच सामन्यात 43 च्या सरासरीने 130 धावा कुटल्या आहेत. पाकिस्तानविरोधात त्याने नाबाद अर्धशतकही ठोकले होते. 


कर्णधार म्हणून रोहित शर्माचा 100 वा सामना -


रोहित शर्माने 2017 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व संभाळले होते.  तो तेव्हा नियमित कर्णधार नव्हता. मात्र विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रविवारी रोहित शर्मा मैदानात उतरताच 100 सामन्यात कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.


शुभमन गिलचा मोठा विक्रम  -


वनडे क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. विश्वचषकातच शुभमन गिल याने हा विक्रम केला आहे. शुभमन गिल याने 38 वनडे डावात दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. हाशिम आमलाने 40 डावात दोन हजार धावा केल्या होत्या. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावा करण्याचा विक्रम गिलच्या नावावर आहे. या यादीत शिखर धवन 11 व्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरकडे दोन हजार धावा करण्याची संधी असेल.