ICC World Cup 2023, IND vs ENG : आज वर्ल्डकपच्या (World Cup 2023) मैदानात टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) एकमेकांशी भिडणार आहे. मैदानात सराव करताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मनगटावर दुखापत झाली होती. लखनौच्या एकना स्टेडियमवर 29 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार की नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सोशल मीडियावरही (Social Media) चाहत्यांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आजच्या सामन्यात रोहितची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का असून शकते. रिपोर्टनुसार, रोहित जखमी होताच फिजिओ मैदानात पोहोचले. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही, मात्र दुखापत गंभीर असल्यास रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहितच्या दुखापतीबाबत संघाकडून कोणतीही अपडेट नाही
रोहितच्या अनुपस्थिती टीम इंडियासाठी नक्कीच वाईट बातमी असेल. मात्र अद्याप याबाबत टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वर्ल्डकपचा संग्राम सुरू झाल्यापासूनच रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅनने आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघांच्या भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं आहे. रोहितनं आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मधील 5 सामन्यांत 311 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 133 स्ट्राईक रेट आहे.
आधीच हार्दिकची अनुपस्थिती, त्यात रोहितही नसणार?
टीम इंडियाला आधीच स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आलं होतं. बीसीसीआयनं म्हटलं होतं की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक टीम इंडियात परतेल, परंतु अलिकडेच समोर आलेल्या अहवालात हार्दिकला दुखापतीतून सावरण्यास आणखी काही वेळ लागू शकतो, अशी माहिती मिळत आहे. हार्दिक पांड्याला झालेली दुखापत गंभीर असून त्याचं लिगामेंट फाटलं आहे आणि त्यातून त्याला बरं होण्यासाठी बराच अवधी लागू शकतो, असंही बोललं जात आहे. त्यामुळे टीम इंडियाला आजचा सामनाही हार्दिकशिवायच खेळावा लागणार आहे. त्यातच जर रोहितही आजच्या सामन्या अनुपस्थित राहिला तर मात्र टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धची झुंज कठिण जाऊ शकते.
आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला प्लेईंग 11मध्ये संधी?
इंग्लंडच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केएल राहुलनं स्पष्ट केलं की, हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. राहुलनं या दरम्यान सूर्यकुमार यादवबाबतही संकेत दिलेत. आजच्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये सूर्यकुमार यादवला जागा मिळू शकते, अंस राहुलनं म्हटलं आहे. रोहित व्यतिरिक्त विराट कोहलीही सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. कोहलीनं 5 सामन्यांत 354 धावा केल्यात. अशातच तो सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या रेकॉर्डपासून काहीसाच दूर आहे.
दरम्यान, टीम इंडियानं या वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज खेळीनं सर्वांचीच मनं जिंकत आहेत. टीम इंडियानं आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 5 सामने खेळले आहेत आणि पाचही जिंकले आहेत. दुसरीकडे गतविजेती इंग्लंड मात्र यंदा फारशी खेळी करु शकलेला नाही. तसेच, इंग्लंडला सेमीफायनल्सचं तिकीट मिळवणं अवघड आहे. इंग्लंडचा आतापर्यंत 4 सामन्यांत पराभव झाला आहे. तसेच, इंग्लंडचा नेट रनरेटही फारसा चांगला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :