पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये धुरळा उडवला. अवघ्या 153 चेंडूत त्याने 244 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 28 चौकार आणि 11 उत्तुंग षटकार लगावले. जेवढी चर्चा पृथ्वीच्या बॅटिंगची सुरु आहे त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या शरीराची आहे. पृथ्वीचा सध्याचा फोटो पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावणार असाल तर जरा थांबा, कारण या फोटोत चाळीशीच्या वाटणाऱ्या पृथ्वी शॉचं वय अवघं 23 वर्षे आहे. 


स्थूल शरीर, लठ्ठ बॉडी आणि गळालेले केस... यामुळे पृथ्वी शॉ 23 चा न वाटता चाळीशीचा वाटू लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर '23 साल के अंकल' अशा कमेंट्स येत आहेत. एकीकडे विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजासारखे फिट अँड फाईन क्रिकेटपटूंना बघण्याची भारतीयांना सवय आहे. त्या तुलनेत रोहित शर्मा आणि फिरकीपटू पियुष चावलालाही त्यांच्या जाडेपणावरुन टोमणे ऐकायला मिळतात. पण पृथ्वी शॉ या दोघांच्या खूप पुढे जाऊन पोहोचला आहे. 


पृथ्वी शॉला जाडेपणावरुन टोमणे मारले जात असले, तरी कौतुक करणाऱ्याही काही मोजक्या कमेंट्स आहेत. एक युजर म्हणतो, आपण त्या देशात आहोत, जिथे स्किलपेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं आहे..






विक्रमांचा मानकरी पृथ्वी शॉ


खरंतर पृथ्वी शॉच्या स्किलबाबत कोणालाही शंका नसावी. मुंबईतील हॅरीस शिल्ड स्पर्धेत पृथ्वी शॉने अवघ्या चौदाव्या वर्षी तब्बल 546 धावा ठोकून, क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच्या नेतृत्त्वातच भारताच्या अंडर19 संघाने 2018 सालचा विश्वचषक जिंकला होता. मग त्याच वर्षी त्याने थेट भारताच्या सीनियर संघात झोकात एन्ट्री मिळवली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकून, आपली झलक दाखवली. पृथ्वी शॉ 2 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये भारताच्या वन डे संघात, तर 2021 मध्ये टी ट्वेण्टी संघात आला. श्रीलंका दौऱ्यात जुलै 2021 मध्ये तो भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र त्यानंतर पृथ्वी शॉ आजपर्यंत टीम इंडियात परतू शकला नाही.. 


पृथ्वी शॉ जेवढ्या त्याच्या खेळीमुळे चर्चेत असतो तेवढे त्याचे राडेही गाजले आहेत. काही महिन्यांपूर्वीच पृथ्वी शॉने छेडछाड आणि मारहाण केल्याचा आरोप मॉडेल सपना गिलने केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. कोर्ट कचेरीही झाली. मात्र याप्रकरणात पृथ्वीला दिलासा मिळाला होता. पृथ्वी शॉने एका मुलाखतीत आपण मनातून खचल्याचं सांगितलं होतं. "ना मला कोणी मित्र राहिलेत, ना मी कोणाशी मनमोकळं बोलू शकतो. मला सध्या एकटं राहायला आवडतं. मला घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही. मी बाहेर पडताच, लोक मला त्रास देतात. त्यामुळे मी घराबाहेरच जात नाही," इतका टोकाचा मेंटल स्ट्रेस असल्याचं पृथ्वी बोलून गेला होता. 


टीकाकारांना बॅटने उत्तर देण्याची अपेक्षा


खेळाडूंचं मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचं असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेटपटूंची मानसिक अवस्था काय असू शकते हे पृथ्वी शॉने बोलून दाखवल्यामुळे समजू शकलं. पण एका एका संधीसाठी जीवाचं रान करणाऱ्या क्रिकेटपटूंना जेव्हा संधी मिळत नाही, तेव्हा फ्रस्टेशन लेव्हल कुठे पोहोचत असेल, याचा अंदाज न लावलेला बरा. पृथ्वीची अवस्था अशी का झाली? याची कारणे अनेक असू शकतात. पण हात आकाशाला लागलेले असताना पाय जमिनीवर ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. पृथ्वीमध्ये टॅलेन्ट कमालीचे आहे. फक्त त्याचा वापर मैदानातच करुन टीकाकारांची तोंडे पृथ्वीने आपल्या बॅटनेच बंद करावीत इतकीच अपेक्षा आहे.