South Africa vs Ireland: दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड (South Africa vs Ireland) यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना काल खेळवण्यात आला. या सामन्यात आयर्लंडने 69 धावांनी दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला असला तरी त्यांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र या मालिका जिंकण्यापेक्षा दक्षिण अफ्रिकेच्या प्रशिक्षकाची सध्या चर्चा रंगली आहे. 


दक्षिण अफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनीचा (Coach JP Duminy fielding for South Africa) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर जेपी ड्युमिनीने 5 वर्षांआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो दक्षिण अफ्रिका संघाचे एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावत आहे. मात्र असे असताना देखील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात जेपी ड्युमिनी मैदानात उतरुन क्षेत्ररक्षण करताना दिसला. 


नेमकं काय घडलं?, Video


दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत, कदाचित त्यामुळे ड्युमिनीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यावे लागले. टेंबा बावुमा दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. दुसरीकडे, विआन मुल्डर वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला होता. त्याच्याशिवाय संघाचा सलामीवीर टोनी डी जोर्जी हा देखील सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यानंतर टोनी मैदानात दिसलेला नाही. त्यामुळे सामन्यातील शेवटच्या षटकांत जेपी ड्युमिनीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागले. आयर्लंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात जेपी ड्युमिनीने झेप मारत चेंडू रोखला. त्याच्या फिल्डिंगच्या व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. 






जेपी ड्युमिनीची कारकीर्द-


दरम्यान, गेल्या वर्षी जेपी ड्युमिनीची दक्षिण आफ्रिका संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटसाठी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जेपी ड्युमिनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 9,000 हून अधिक धावा केल्या आहेत. तर 130 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. जेपी ड्युमिनीने सप्टेंबर 2017 मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. सुमारे तीन वर्षांनंतर, त्याने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने सुमारे 16 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.


संबंधित बातमी:


IPL: विजय...पराभव, काहीच फरक पडत नाही; आयपीएलच्या एका हंगामातून संघ मालकांची कोट्यवधींची कमाई