world cup 2019 : बुडत्याचा पाय खोलात असं म्हणतात, तसंच काहीसं या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचं झालं आहे. दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाविरुद्धचा सामना काही तासांवर आलेला असताना त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाचं मुख्य अस्त्र असलेल्या डेल स्टेनला दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे.


खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेन विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्येही खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिका संघात आता स्टेनऐवजी ब्युरन हेण्ड्रिक्सचा समावेश करण्यात आला आहे.

यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. दक्षिण आफ्रिकेने आधी इंग्लंड आणि मग बांगलादेशकडून पराभव स्वीकारला आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या शिलेदारांच्या पाठीशी दुखापतींचं सत्र लागलं आहे. डेल स्टेनसह हाशिम अमला आणि लुन्गी एनगिडी हे दोघंही सध्या दुखापतींनी बेजार आहेत.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आजवर एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. प्राथमिक साखळीत सर्वोत्तम ठरलेल्या चार संघांना बाद पद्धतीच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आयसीसीच्या नव्या फॉरमॅटनुसार विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठायची, तर दहा फौजांच्या प्राथमिक साखळीत नऊपैकी किमान सहा सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

भारताच्या साखळी सामन्यांचं वेळापत्रक

- 5 जून : भारत वि दक्षिण आफ्रिका
- 9 जून : भारत वि ऑस्ट्रेलिया
- 13 जून : भारत वि न्यूझीलंड
- 16 जून : भारत वि पाकिस्तान
- 22 जून : भारत वि अफगाणिस्तान
- 27 जून : भारत वि वेस्ट इंडिज
- 30 जून : भारत वि इंग्लंड
- 2 जुलै : भारत वि बांगलादेश
- 7 जुलै : भारत वि श्रीलंका

उपांत्य आणि अंतिम सामना

इंग्लंडमधील विश्वचषकाचे दोन उपांत्य सामने अनुक्रमे 9 आणि 11 जुलैला, अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.