Sourav Ganguly on Francise League: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा (International Cricket) टी-20 लीगला (T20 League) खेळाडूंकडून दिली जात असलेली पसंती टिकाऊ नाही, कारण भविष्यात केवळ काही आर्थिकदृष्ट्या मजबूत लीग चालवण्यास सक्षम असतील, असं म्हणत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Former Indian Captain Sourav Ganguly) यांनी फ्रेंचायझी क्रिकेटवर (Franchise Cricket) मोठं वक्तव्य केलं आहे. क्रीडा विश्वात गांगुली यांचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, सध्या क्रिकेटविश्वात लीग म्हणजेच, फ्रेंचायझी क्रिकेटचं महत्त्व वाढत असल्याचं दिसून येत आहे. जगभरात T20 लीगच्या वाढत्या संख्येमुळे खेळाडू आता देशासाठी खेळण्यापेक्षा फ्रेंचायझी क्रिकेटला प्राधान्य देत आहेत. बिग बॅश लीगनंतर आता यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही लीग होत आहेत. याशिवाय वर्षाच्या शेवटी अमेरिकेतही लीगचंही आयोजन करण्यात आलं आहे.


सौरव गांगुली एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "आम्ही जगभरात होणाऱ्या लीगबद्दल बोलत असतो. आयपीएल ही पूर्णपणे वेगळी लीग आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग सध्या चर्चेत आहे, त्याचप्रमाणे द हंड्रेडनं यूकेमध्येही प्रसिद्धी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेची लीगही क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरतेय."


"या सर्व लीग ज्या देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे तिथे होतायत. मला विश्वास आहे की, येत्या चार-पाच वर्षांत फक्त काही लीग शिल्लक राहतील आणि त्या कोणत्या असतील हेदेखील मला माहितीये. सध्या प्रत्येक खेळाडूला नव्या लीगमध्ये सहभागी व्हायचंय, पण येत्या काळात त्यांना कळेल की, कोणती लीग महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंकडून लीग क्रिकेटपेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले जाईल.", असं सौरव गांगुली म्हणाले. तसेच, हे बोलत असताना त्यांनी क्रिकेट प्रशासनाचं महत्त्वही सांगितलं. यावेळी त्यांनी झिम्बाब्वेचं उदाहरण दिलं, जिथे प्रशासकीय कारणांमुळे क्रिकेटचं महत्त्व फारच कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. 


सौरव गांगुली म्हणाले की, "मी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा पाच वर्षे अध्यक्ष होतो आणि त्यानंतर तीन वर्ष बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. मी आयसीसीमध्येही भारताचं प्रतिनिधित्वही केलंय आणि पायाभूत सुविधा आणि सहकार्यानंच खेळ शक्य आहे." सौरव गांगुली पुढे बोलताना म्हणाला की, "मी 1999 मध्ये पहिला विश्वचषक खेळलो होतो. त्यावेळी झिम्बाब्वे फार चांगला संघ होता, तो इतर कोणत्याही संघाचा अगदी सहज पराभव करू शकत होता. त्यावेळी झिम्बाब्वे क्रिकेटकडे फारसे पैसे नव्हते. अर्थात, भारताकडेही ते नव्हते." 


"मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स किंवा जोएल गार्नर यांच्या काळात वेस्ट इंडिजकडे पैसा कुठे होता. त्यामुळे माझं असं मत आहे की, खेळाडूंसाठी चांगलं प्रशासन खूप महत्त्वाचं आहे. पैसा हा मुद्दा नाही. खेळाडू आणि प्रशासक यांच्यातील चांगले संबंध अनेक समस्या सोडवतात.", असंही सौरव गांगुली यांनी बोलताना स्पष्ट केलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नॅथन लियॉन अन् कमिन्सचा विराट कसा करणार सामना? त्यांच्याविरोधात किंग कोहलीची आकडेवारी