कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज कोलकाताच्या अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना 27 जानेवारीला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 29 जानेवारी रोजी त्यांची दुसरी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सौरव गांगुली यांच्यावर गुरुवारी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने अँजिओप्लास्टी केली. गांगुलीला हृदयविकाराच्या धक्क्यामुळे बुधवारी एका महिन्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सौरव गांगुलीच्या नसांमध्ये ब्लॉकेज आल्यामुळं दोन स्टेंट टाकण्यात आले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, संपूर्ण चाचण्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. माहितीनुसार, सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, सौरव गांगुली रुग्णालयात पोहोचताच पुन्हा एकदा त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं
काही दिवसांपूर्वी आलेली हृदयविकाराचा सौम्य झटका
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
- सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी, आणखी दोन स्टेंट लावल्या
- छातीत दुखू लागल्यामुळं नाही, तर रुटीन चेकअपसाठी सौरव गांगुली रुग्णालयात; डॉक्टरांचं स्पष्टीकरण