कोलकाता : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली असून काल त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, सौरव गांगुली रुग्णालयात पोहोचताच, पुन्हा एकदा त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, आता रुग्णालय प्रशासनाने स्वतः सौरव गांगुली यांच्या तब्ब्येतीसंदर्भात माहिती देत, स्पष्टीकरण दिलं आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली केवळ रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते.


रुग्णालय प्रशासनाने एक प्रेस रिलीज जारी केली असून त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, "सौरव गांगुली आपल्या हृदयाच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले होते. गेल्यावेळी ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बरे होऊन घरी परतले होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा असून त्यांना कोणताही त्रास होत नाही."


दरम्यान, काल (बुधवार) बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली असल्याचं सांगण्यात येत होतं. सौरव गांगुली यांच्या अचानक छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचंही म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, हे वृत्त फेटाळून लावत रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सौरव गांगुली रुटीन चेकअपसाठी आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली होती


काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.