Shubman Gill profile Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होत असलेल्या अंतिम सामन्यात, सर्वाधिक लक्ष आहे ते टीम इंडियाचा प्रिन्स शुभमान गिलकडे (Shubman Gill). वन डे रँकिंगमध्ये जगात अव्वल असलेला शुभमान गिल हा कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला येऊन, भारताच्या डावाला आकार देतोय. शुभमान गिल हा कसोटी, वन डे आणि टी 20, प्रत्येक फॉरमॅटमध्ये मॅच्युअर होत जाणारा खेळाडू आहे. 25 वर्षाच्या शुभमन गिलच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 14 शतकं आहेत. कसोटी, वन डे आणि टी 20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं ठोकण्याचा मान आतापर्यंत केवळ 4 भारतीयांच्याच नावे होता.
यामध्ये रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांची नावं होती. त्यामध्ये शुभमन गिलचं नावही अॅड झालं आहे.
शुभमान गिलने जसजसे सामने खेळत गेला, तसतसा तो आणखी मॅच्युअर होत गेला. भारताच्या संघाची जबाबदारी अंगावर घेतोय, जबाबदारीने खेळतोय आणि टीम इंडियाला धडाकेबाज सलामी देतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शुभमान गिलने बांगलादेशविरुद्ध अप्रतिम खेळी करत, शतक ठोकलं होतं.
शुभमान गिलचा कुठलाही शॉट कच्चा वाटत नाही. मग तो स्ट्रेट ड्राईव्ह असो, पूल शॉट असो किंवा मग भल्या भल्यांना प्रेमात पाडायला लावणारा कव्हर ड्राईव्ह..
जिथे संधी मिळाली, तिथे पथाका फडकवला (Shubman Gill debut)
शुभमन गिलने यापूर्वी अनेकदा चमक दाखवली आहे. अंडर 19 वर्ल्डकप असो की देशांतर्गत विजय हजारे, रणजी चषकासारख्या स्पर्धा, गिलने जिथे संधी मिळाली, तिथे पताका फडकावला. पण शुभमन चमकला तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून शुभमन गिलने डिसेंबर 2020 मध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं वय अवघं 20-21 होतं. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात 80 धावा, दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात 81 धावा ठोकल्यानंतर, शुभमन तळपला तो तिसऱ्या कसोटीत. त्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 90 धावा केल्या. मात्र या 90 धावा एखाद्या शतकापेक्षा कमी नव्हत्या. शुभमनच्या त्या खेळीमुळे भारताला हा सामना 3 विकेस्ट राखून जिंकता आला होता.
द्रविडचं मार्गदर्शन, अंडर 19 वर्ल्डकप अजिंक्यपद (Shubman Gill under 19)
शुभमन गिलची क्रिकेट जगताला ओळख झाली ती 2018 च्या अंडर 19 विश्वचषकात. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ करत होता. पृथ्वी शॉला उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची साथ होती. भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करुन, विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या संपूर्ण सीरिजमध्ये झळकला होता तो शुभमन गिल.
शुभमन गिलची बॅटिंग स्टाईल विराट कोहलीसारखी आहेत, असं त्यावेळी सर्वजण म्हणत. गिलने अंडर 19 विश्वचषकात 372 धावा करुन, मॅन ऑफ द सीरिजचा किताब पटकावला होता. पाकिस्तानविरुद्ध त्याने झळकावलेल्या शतकामुळे त्याला अख्ख्या देशाने डोक्यावर घेतलं होतं.
शुभमन गिलचे विक्रम (Shubman Gill Record)
शुभमन गिल नेहमी त्याच्या वयाच्या वरच्या गटात खेळत राहिला. 14-15 व्या वर्षी तो अंडर 16 संघात खेळला. पंजाबमधील अंडर 16 स्पर्धेत त्याने एकट्याने 351 धावा ठोकल्या. हा भीमपराक्रम करत त्याने निर्मल सिंगसोबत 587 धावांची सलामीची भागीदारी रचली होती.
शुभमन गिलने 2016-17 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी लिस्ट ए क्रिकेटमध्ये विजय हजारे चषकातून पदार्पण केलं. मग पुढच्याच वर्षी तो रणजी चषकाच्या मैदानात उतरला. रणजी चषकाच्या दुसऱ्यात सामन्यात त्याने शतक ठोकलं.
शुभमन गिलची गर्लफ्रेंड (Shubman Gill Girlfriend)
सध्या शुभमन गिलच्या बॅटिंगची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा त्याच्या गर्लफ्रेंडची आहे. शुभमन गिल सध्या साराला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण ही सारा कोण हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिलच्या कथित रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
शुभमन गिल ICC रँकिंग (Shubman Gill ICC ranking)
शुभमन गिल टीम इंडियाच्या सलामीचा कणा बनला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभमन गिलने ICC रँकिंगमध्ये मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. रँकिंगमध्ये विराट कोहलीच्याही पुढे गिल पोहोचला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गिल वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. वन डे रँकिंगमध्ये गिल पहिला, बाबर आझम दुसऱ्या, आफ्रिकेचा क्लासेन तिसरा, विराट कोहली चौथा आणि रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या