India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final: लाईट्स...कॅमेरा...अॅक्शन...चॅ
भारतीय संघाचं या स्पर्धेतलं टीम कॉम्बिनेशन खूपच इंटरेस्टिंग आहे. चार फिरकी गोलंदाज (जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती) त्यातले तिघे डावखुरे (जडेजा, अक्षर, कुलदीप) आहेत. तरी तिघांचीही शैली भिन्न आहे. जडेजाची अचूकता, त्याचा टर्न तर, अक्षरला उंचीमुळे मिळणारा बाऊन्स, त्याचंही टप्प्यातलं सातत्य आणि कुलदीपचा इफेक्टिव्ह चायनामन यामुळे समोरच्या फलंदाजासमोर प्रत्येक वेळी आव्हानाचं नवीन ताट वाढलेलं असतं. त्यात वरुण चक्रवर्तीचा बुचकळ्यात टाकणारा लेग स्पिन यामुळे आपला मारा आणखी प्रभावी जाणवतोय. बुमरासारखा चॅम्पियन गोलंदाज नसतानाही आपण सातत्याने समोरच्या टीमला ब्रेक लावतोय. यावरुन या ताकदीची कल्पना यावी. वनडे तसंच टी-ट्वेन्टी मध्येही मिडल ओव्हर्समध्ये जिथे सामन्याची ग्रिप तुमच्याकडून सुटण्याची शक्यता असते तिथे आपल्या स्पिनर्सनी वनडे वर्ल्डकप, टी-ट्वेन्टी विश्वचषक आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही कंजुषपणे धावा देत सामन्यावरची पकड आणखी मजबूत केली.
दुबईचं मैदानही आपले फिरकीपटू गाजवतायत. त्यात एकाच मैदानावर आपण सगळे सामने खेळतोय, याबद्दल काही जण नाराजीही व्यक्त करतायत. पण, मैदान एकच असलं तरी सातत्यपूर्ण कामगिरी करणं महत्त्वाचं असतं. कारण, समोरचा प्रतिस्पर्धी, दिवस, वातावरण सारं काही बदलत असतं. असो. अशा चर्चा होतच राहतात. हे झालं गोलंदाजीविषयी, फलंदाजीतही आपला संघ मजबूत आहे. रोहित, गिल, विराट, श्रेयस ही आघाडीची फळी सातत्याने धावा करतेय. त्यात रोहित आणि विराट कारकीर्दीच्या उत्तरार्धातील टप्प्यावर आणखी एक सोनेरी पान लिहायला नक्कीच उत्सुक असतील. रोहितने सलामीला येऊन समोरच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत धावांचा खजिना भरायचा आणि विराटने तिसऱ्या नंबरवर येऊन एकेरी-दुहेरी धावांवर भर देत, काही वेळा खराब चेंडूंचा समाचार घेत शेवटपर्यंत खेळत या खजिन्यात भर घालून समोरच्या टीमच्या विजयाच्या मनसुब्याला कुलूप लावायचं हा फॉर्म्युला वर्क झालाय. श्रेयसच्या कन्सिस्टंट बॅटिंगने मधल्या फळीत विराटवरचं दडपण काढून टाकलंय. त्यामुळे तो स्थिरावायला वेळ घेऊन खेळत नंतर स्ट्राईक रेट वाढवू शकतो. राहुलनेही आक्रमण आणि बचावाचा संगम साधत उत्तम फलंदाजी वेळोवेळी केलीय. हाणामारीच्या षटकांतले पंड्यासारखे स्पेशालिस्ट, तर मोठे फटके लीलया खेळू शकणारे अक्षर आणि जडेजासारखे खेळाडूही बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत. यामुळे आठ नंबरपर्यंत आपल्याकडे तगडी बॅटिंग आहे, क्षेत्ररक्षणातही आपण सतर्क आहोत, फायनलचं स्टेज पाहता त्यात आणखी दक्ष राहू अशी आशा आहे. नवीन दिवस, नवीन प्रतिस्पर्धी, नवीन आव्हान आणि मुख्य म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पणाला लागलीय. होळी जवळ येतेय, विजयाचा रंग रंगून जाण्यासाठी रोहितसेनेला शुभेच्छा देऊया.