शुभमन गिल भारताचा पुढील विराट कोहली, माजी खेळाडूने केले प्रिन्सचे कौतुक
virat kohli: शुभमन गिल अवघ्या 24 व्या वर्षी टीम इंडियाचा स्टार खेळाडू झालाय. वनडेमध्ये शुभमन गिल याने धावांचा पाऊस पाडलाय.

Shubman Gill : शुभमन गिल अवघ्या 24 व्या वर्षी टीम इंडियाचा स्टार खेळाडू झालाय. वनडेमध्ये शुभमन गिल याने धावांचा पाऊस पाडलाय. आयसीसी क्रमवारीत तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. आशिया चषकात गिलने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. आगामी विश्वचषकात शुभमन गिल याचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. शुभमन गिल याच्या फलंदाजीचे सर्वजण चाहते आहेत. यामध्ये आजी-माजी खेळाडूंचाही समावेश आहे. भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना यानेही गिलचे कौतुक केलेय. शुभमन गिल भारताचा पुढील विराट कोहली असल्याचे रैना याने सांगितले. तो जिओ सिनेमावर बोलत होता. शुभमन गिल याच्याकडून विश्वचषकात मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. शुभमन गिल याच्यामध्ये चाहत्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता आहे, असा विश्वास टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केला.
शुभमन गिलने आयपीएल आणि आशिया चषक यासारख्या मोठ्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. शुभमन गिलने आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनून इतिहास रचला. आशिया कपमध्ये गिलने 6 सामन्यात 75 च्या सरासरीने 302 धावा केल्या होत्या. यात बांगलादेशविरुद्ध अत्यंत कठीण परिस्थितीत झळकावलेल्या शतकाचाही समावेश आहे. शुभमन गिल याचे कौतुक सुरेश रैना याने केले. त्याशिवाय विराट कोहलीसोबत तुलनाही केली.
शुभमन गिल याच्याबद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला की, ''वनडे विश्वचषकात गिल भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. माझ्या मते शुभमन गिल एक सुपरस्टार आहे आणि तो भारतासाठी पुढील विराट कोहली असल्याचे सिद्ध होईल. या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये गिलचा दर्जा खूप वाढणार आहे. यानंतर आपण सगळे गिलबद्दल बोलत राहू.''
Suresh Raina said "Shubman Gill is one of the most important players in the World Cup - I know that he wants to be a superstar and wants to be the next Virat Kohli & is in that aura already and we will talk about Gill more after the World Cup". [JioCinema] pic.twitter.com/HWSTGKYOVI
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2023
शुभमन गिलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी -
शुभमन गिल याच्या क्षमतेबाबत बोलताना सुरैश रैना म्हणाला की, ''शुभमन स्पिन आणि वेगवान गोलंदाजांना चांगला खेळतो. रोहित शर्माने ज्या पद्धतीने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पाच शतके ठोकली होती. त्याचपद्धतीने शुभमन गिल यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करेल. गिलला कुठे गोलंदाजी करायची हे फिरकीपटूंना समजत नाही. गिल थांबणार नाही. रोहित शर्माने २०१९ विश्वचषकात जे केले ते गिल भारतासाठी नक्कीच करेल.''
शुभमन गिल सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. विश्वचषकात रोहित शर्मासह भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर असेल. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताचा शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आठव्या तर रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत सिराज पहिल्या स्थानावर आहे. कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर आहे.




















