IND vs AUS, 2nd ODI Shreyas Iyer Century : ऑस्ट्रेलियाविरोधात इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकले. विश्वचषकापूर्व श्रेयस अय़्यरने वादळी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. दुखापतीमुळे अय्यर सहा महन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. आशिया चषकात त्याने कमबॅक केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यातच दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अय्यरला अखेरच्या तीन सामन्यात बाहेर बसावे लागले होते. पण आता ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी केली. अय्यरच्या वादळी फलंदाजीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  


इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने  86 चेंडूत शतक ठोकले.  श्रेयस अय्यरचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. या शतकासह श्रेयस अय्यरने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपला फॉर्म परत आल्याचे दाखवले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर तंबूत परतला. श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यापूर्वी मोहाली वनडेत श्रेयस अय्यर लवकर बाद झाला होता. मात्र या सामन्यात शानदार पुनरागमन करत शतक ठोकले. 






गिल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी - 


ऋतुराज गायकवाड झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि अय्यर दोघांनीही शतके ठोकली. अय्यर आणि गिल यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली. १६४ चेंडूमध्ये या दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. 


भारताची खराब सुरुवात -


ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 16 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. भारताचा डाव गडगडणार की काय असेच वाटत होते. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली.