Rahul Dravid Son Samit In Karnataka's Under-19 Squad : भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समितही वडिलांच्या मार्गावर आहे. समितला विनू मांकड ट्रॉफी 2023 साठी कर्नाटकच्या 15 सदस्यीय अंडर-19 संघात स्थान मिळाले आहे. विनू मांकड स्पर्धा ही एकदिवसीय स्वरुपात आहे, ज्यामध्ये समित दमदार कामगिरी करावी लागणार आहे.  ही स्पर्धा 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे खेळवली जाणार आहे.



समित यापूर्वी 14 वर्षांखालील स्पर्धेत कर्नाटककडून खेळला आहे. पण समित प्रथमच अंडर-19 साठी मैदानात उतरणार आहे. यावेळी त्याला वरिष्ठ क्रिकेटचा काहीसा अनुभव मिळणार आहे. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 मध्ये राज्य स्तरावर खेळला आहे.  राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित व्यतिरिक्त धाकटा मुलगा अन्वय देखील क्रिकेट खेळतो. अन्वयला यंदाच्या झोनल टूर्नामेंटसाठी कर्नाटक अंडर-14 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. दोन्ही मुले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत.


मुलाला खेळाताना राहुल द्रविड पाहता येणार नाही 



5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक 2023 ला सुरूवात होणार आहे. भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा राहुल द्रविड वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत व्यस्त असणार आहे. तर विनू मांकड ट्रॉफी 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत वर्ल्ड कपमुळे तो समित याला अंडर-19 स्पर्धेत खेळताना बघता येणार नाही.


दी वॉलची दमदार कामगिरी - 
 दोन वर्षांपासून राहुल याने भारताचा कोच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याआधी भारतासाठी फलंदाजीत आपले योगदान दिले. राहुल द्रविडला वॉल म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखले जाते. राहुल द्रविड हा भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 1996 ते 2012 पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात द्रविडने 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळले. 286 कसोटी डावांमध्ये त्याने 52.31 च्या सरासरीने 13288 धावा कुटल्या. ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 318 डावांमध्ये त्याने 39.16 च्या सरासरीने 10889 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 12 शतके आणि 83 अर्धशतके केली.