Shoaib Akhtar on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. पीटीआय वृत्त संस्थनं दिलेल्या माहितीनुसार, भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. जसप्रीत बुमराहनं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणं, भारतीय संघाच्या अचडणीत वाढ करू शकतात. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. ज्यात शोएब अख्तर जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीवर भाष्य करतोय. 


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तरनं वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा दिग्गज शेन बॉन्ड यांचं उदाहरण देत म्हटलंय की,"भारत बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. कारण, बुमराहची अॅक्शन पाठीच्या दुखापतींना आमंत्रण देऊ शकतात. बुमराहची गोलंदाजी फ्रंटल अॅक्शनवर अवलंबून आहे. अशा प्रकारची अॅक्शन असलेले गोलंदाज त्यांच्या पाठीवरून आणि खांद्यावरून वेग प्राप्त करतात. पुढच्या आर्म अॅक्शन असलेल्या गोलंदाजाच्या पाठीला दुखापत झाल्यास, त्यानं कितीही प्रयत्न केल्यास दुखापत त्याचा पाठलाग सोडत नाही"


जसप्रीत बुमराहची जागा कोण भरून काढणार?
जसप्रीत बुमराह विश्वचषकाला मुकणार असल्याचं बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं याबाबत माहिती दिलीय. महत्वाचं म्हणजे, जसप्रीत बुमराह संघाबाहेर झाल्यास त्याच्याऐवजी कोणत्या गोलंदाजाला संघात संधी मिळेल? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. तसेच जसप्रीत बुमराहचा पर्यायी गोलंदाज त्याची जागा भरून काढू शकतात का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. 


जसप्रीत बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
जसप्रीत बुमराहनं 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटी सामन्यात बुमराहच्या नावावर 128 विकेट्सची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराहनं 121 विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 70 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा भारताचा मुख्य गोलंदाज असून त्याचं विश्वचषकातून बाहेर पडणं भारतीय संघासाठी धोक्यांची घंटा आहे. 


हे देखील वाचा-