Sarfaraz Khan : मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान(Sarfaraz Khan)  मागील काही दिवसांपासून सारखा चर्चेत आहे. या युवा फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. यावर अनेक दिग्गजांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण आता याच सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान चर्चेत आला आहे. तोही क्रिकेटर असून मुशीरने सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावलं आहे. सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. सध्या मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे.


मुशीर खानचं झंझावाती त्रिशतक


हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 8 विकेट गमावत 704 धावा केल्या. यावेळी मुशीर खानने 339 धावांची तगडी इनिंग खेळली. मुशीर खानच्या खेळीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट. मुशीर खानने केवळ 367 चेंडूत 339 धावा केल्या. अशाप्रकारे मुशीर खानचा स्ट्राईक रेट 90 पेक्षा जास्त होता. त्याने आपल्या खेळीत 34 चौकार आणि 9 षटकार लगावले. मुशीर खानशिवाय अथर्व विनोदने द्विशतक झळकावलं. अथर्व विनोदने 214 धावांची खेळी केली.


सरफराज जबरदस्त फॉर्मात  


सरफराज खान मागील तीन हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या फलंदाजाने 2019-20 मध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर 2021-22 मध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही त्याने आतापर्यंत 900 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 53 डावांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 80 पेक्षा जास्त आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत, तो दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.


नेटकऱ्यांकडून बीसीसीआयवर टीकास्त्र


बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयनं (BCCI) निवडलेल्या या संघात मुंबईचा फलंदाज सरफराज खानला (Sarfaraz Khan) संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील गेल्या तीन हंगामात सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही सरफारजला संधी न मिळाल्याने नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. दरम्यान आता त्याने नुकतच दिल्लीविरुद्ध एक शतक ठोकत बीसीसीआयच्या निवड समितीला विचार करायला भाग पाडलं आहे.


हे देखील वाचा-