India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सध्या हा सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 


सध्या 62 षटकात न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावत 201 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स फलंदाजी करत आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम 15 धावा, विल यंग 18 धावा,डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा तर रचिन रवींद्रने 65 धावा केल्या. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने 3 आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. 


नेमकं काय घडलं?, पाहा Video


भारत आणि न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. रवीचंद्रन अश्विन संघाचे 24 वे षटक टाकत होता. यावेळी समोर विल यंग फलंदाजी करत होता. रवीचंद्रन अश्विनने लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला असताना विल यंगच्या बॅटीला हा चेंडू थोडासा घासून गेला आणि यष्टीरक्षक करत असलेल्या ऋषभ पंतने झेल घेतला. मात्र विल यंगच्या बॅटीला हा चेंडू लागून आला असं ऋषभ पंतला जाणवले नाही. त्यामुळे पंचानी देखील नॉट आऊट दिले. परंतु रवीचंद्रन अश्वीन आणि शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्फराज खानला विश्वास होता की विल यंगच्या बॅटीला नक्की चेंडू आदळला आहे. त्यामुळे सर्फराज खानने कर्णधार रोहित शर्माला डीआरएस घेण्याची मागणी केली. सर्फराजच्या या मागणीवर रोहित शर्मा सुरुवातीला सहमत नव्हता. मात्र मी बोलतोय ना...रिव्ह्यू घे घे घे...असं म्हणत डीआरएससाठी सर्फराज रोहित शर्माच्या मागेच लागला. त्यानंतर रोहितने डीआरएस घेतला आणि विल यंगच्या बॅटीला चेंडू लागल्याचे स्पष्ट झाले. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसह मैदानातील उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी टाळ्यात वाजवत जल्लोष केला. 






पुणे कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन-


यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.


पुण्याच्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन-


टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरुके.


संबंधित बातमी:


Sikandar Raza: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; विक्रम मोडत झळकावले सर्वात जलद शतक, कोण आहे सिकंदर रझा?