Sikandar Raza Fastest T20 Hundred: 23 ऑक्टोबर 2024 ही तारीख झिम्बाब्वे आणि गाम्बिया (Gambia vs Zimbabwe) या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. याच दिवशी झिम्बाब्वेने टी-20 क्रिकेटमध्ये 344 धावा करत इतिहास रचला आहे, तर गाम्बियाने 290 धावांनी पराभवाचा लाजिरवाणा विक्रम जोडला आहे. झिम्बाब्वे आणि गाम्बिया यांच्यात झालेल्यी टी-20 सामन्यात सिकंदर रझाने अनेक विक्रम करत इतिहास बदलून टाकला.
झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (Sikandar Raza) टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने 43 चेंडूत 15 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 133 धावा केल्या. सिकंदर रझा टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरचा रेकॉर्ड तोडला. रोहित आणि मिलर या दोघांनी 2017 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 35-35 चेंडूत शतके झळकावून मोठी कामगिरी केली होती.
टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे फलंदाज-
सिकंदर रझा - 33 चेंडू वि. गाम्बिया, 2024
रोहित शर्मा - श्रीलंका विरुद्ध 35 चेंडू, 2017
डेव्हिड मिलर - बांगलादेश विरुद्ध 35 चेंडू, 2017
जॉन्सन चार्ल्स - 39 चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023
संजू सॅमसन - 40 चेंडू विरुद्ध बांगलादेश, 2024
कोण आहे सिंकदर रझा?
सिकंदर रझाने 2013 मध्ये झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात पाकिस्तानमधील सियालकोटमधून झाली. सिकंदरचा जन्म 24 एप्रिल 1986 रोजी सियालकोटमध्ये झाला. सिंकदर रझाला मोठा झाल्यावर त्याला पाकिस्तानी हवाई दलात भरती व्हायचे होते. पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. दुर्दैवाने तो एका चाचणीत नापास झाला, त्यामुळे त्याचे हवाई दलात जाण्याचे स्वप्न भंगले. सिंकदर रझाचे कुटुंब 2002 मध्ये झिम्बाब्वेला स्थायिक झाले.
पाकिस्तानची उडवली होती खिल्ली-
सिकंदर रझा हा मूळचा पाकिस्तानी असला तरी काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेने 2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला एका धावेने पराभूत करून आश्चर्यचकित केले होते. या पराभवामुळे पाकिस्तान संघावर जोरदार टीका झाली होती. सामन्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाला जेव्हा विचारण्यात आले की, सामन्यात त्याला कधी वाटले की आपण पाकिस्तानला हरवू शकतो. प्रत्युत्तरात सिकंदर म्हणाला की, पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच आम्ही पाकिस्तानला पराभूत करू शकू, असा विश्वास होता. सिंकदर रझाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली.