Sania Mirza and Shoaib Malik Marriage in Trouble:  भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांना क्रीडा जगतातील चांगलं जोडपं म्हणून ओळखले जातं. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असून सानिया मिर्झा शोएब मलिकला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे दिली जात आहे. 


पाकिस्तानी मीडियामध्ये झळकत असलेल्या बातमीनुसार, सानिया आणि शोएब वेगवेगळे राहत असल्याचं सांगितलं जातंय. अलीकडेच, पाकिस्तानी क्रिकेट शो 'आस्क द पॅव्हेलियन' मध्ये शोएब मलिकला सानिया मिर्झाच्या टेनिस अकादमी आणि तिथल्या ठिकाणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शोएब म्हणाला होता की, 'मला सानियाच्या लोकेशनबद्दल योग्य माहिती नाही. मी कधीच अकादमीत गेलो नाही. शोएबच्या या उत्तरानंतर वकार युनूसही आश्चर्यचकीत झाला होता. तू कसा पती आहेस? असंही त्यावेळी वकार युनूसनं म्हटलं होतं. 


सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा?
सानियानं 12 एप्रिल 2010 रोजी शोएब मलिकसोबत विवाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. गूगल ट्रेंड्सनुसार 2010 मध्ये सानियाला सर्वात जास्त विवाह प्रस्ताव आले होते. शिवाय, इंटरनेटवर सगळ्याच जास्त सर्च झालेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झा होती. नुकताच शोएब मलिकनं मुलगा इजहानचा वाढदिवशी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु, सानिया मिर्झानं इजहानचा एकही फोटो पोस्ट केला नाही. त्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांना वेग आला. मात्र, याबाबत दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.


शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शोएब मलिकनं आतापर्यंत 25 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 123 टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शोएबच्या नावावर 1 हजार 898 धावंची नोंद आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं  7 हजार 423 धावांचा टप्पा गाठलाय. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 2 हजार 435 धावा केल्या आहेत. शोएब 2008 मध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा भाग होता. त्यानं आयपीएलच्या सात सामन्यात 52 धावा केल्या होत्या. 


हे देखील वाचा-