Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळता येणार नाहीत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक निवेदन समोर आणलं आहे. त्यात म्हटले आहे की, "दानुष्का गुणथिलाका याने ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर आणि तिच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे.'' या निवेदनात या आरोपाची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षाही केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाला अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडनी पोलिसांनी श्रीलंका टीम थांबलेल्या हॉटेलमधून दानुष्काला अटक केली होती. सध्या दानुष्का सिडनीत असून श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला परतला आहे. दरम्यान न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना 'रोझ बे' या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी 31 वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली, अशीही माहिती समोर आली आहे.
दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकपमधून बाहेर
टी-20 विश्वचषक स्पर्धेत दानुष्का गुणथिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेव सामना खेळला. त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याजागी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता.
दानुष्का गुणथिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणथिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दानुष्का गुणथिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत