Mumbai Cricket Association Election 2022: महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीला सत्तेवरून नुकतंच पायउतार व्हावं लागलं, पण मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणुकीत एक नवी महाआघाडी उभी राहिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे एमसीएतल्या या महाआघाडीचे संघटक आहेत. पवार आणि शेलारांनी मिळून एमसीएतल्या महाआघाडीची अशी काय मोट बांधलीय की त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदेचीही शिवसेना आहे. बहुजन विकास आघाडीच्या पंकज ठाकूरांचे जावई अजिंक्य नाईक यांचंही नाव पवार-शेलारांच्या महाआघाडीतून सचिवपदाच्या शर्यतीत आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षात भाजप आणि शिंदे गटानं हातमिळवणी करून महाविकास आघाडीला सिंहासनावरून खाली ओढलंय, पण आशिष शेलारांना एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आणण्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी आणि भाजपसह दोन गटांमध्ये विखुरलेली शिवसेनाही एक झाली होती. त्याच वेळी बीसीसीआयच्या निवडणुकीनं एमसीएच्या निवडणुकीला कलाटणी दिली. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या आग्रहामुळं आशिष शेलार यांनी बीसीसीआयच्या खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळं त्यांना एमसीएच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. परिणामी पवार-शेलार पॅनेलसाठी अध्यक्षपदाची निवडणूक सोपी राहिलेली नाही. माजी कसोटीवीर संदीप पाटलांच्या विरोधात विद्यमान उपाध्यक्ष अमोल काळे यांना अध्यक्षपदी निवडून आणण्याचं आव्हान पवार-शेलार पॅनेलसमोर आहे.


संदीप पाटील हे आधी पवार पॅनेलकडून निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाले होते. पण पवार-शेलार पॅनेलमधून त्यांचा पत्ता सुमडीत कापण्यात आला. आता मुंबई क्रिकेट ग्रुप त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय. रवी सावंत यांच्या महाडदळकर गटाकडूनही काही उमेदवार एमसीए निवडणुकीत आहेत. पण अध्यक्षपदासाठी महाडदळकर गटाचा उमेदवार नाही. अमोल काळे हे एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष असले तरी मुंबई क्रिकेट आणि त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी काळेंची ओळख असली तरी एमसीएत आशिष शेलारांनी त्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही एमसीएच्या मतदारांची खास बैठक घेऊन काळेंच्या पंखात नवं बळ भरलंय.


एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निव्वळ क्रिकेटिंग मुद्यांचा विचार केला तर काळेंच्या तुलनेत संदीप पाटलांचं पारडं जड भासतं. कसोटी आणि वन डे क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणारे संदीप पाटील हे भारताच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलीय. एक क्रिकेटर या नात्यानं संदीप पाटील यांची लोकप्रियता फार मोठी आहे. पण एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आजवर मतदारांनी राजकीय हितसंबंधांवरच आपल्या पसंतीची मोहोर उमटवलीय. त्यामुळं १९९१ साली माधव मंत्रींना मनोहर जोशींकडून, 2001 साली अजित वाडेकरांना शरद पवारांकडून आणि 2011 साली दिलीप वेंगसरकरांना विलासराव देशमुखांकडून पराभव स्वीकारण्याची वेळ आली होती. यंदा हा इतिहास बदलायचा तर संदीप पाटलांसमोर केवळ अमोल काळेंचं नाही, तर पवार-शेलार महाआघाडीचं आव्हान आहे.


एमसीएच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडूनच कार्यकारिणीसाठी आपलं नशीब आजमावतायत. त्या तिघांच्या उमेदवारीनं कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी तब्बल २३ जणांमधली शर्यत आणखी चुरशीची बनवलीय. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेयत.


एकंदरीत काय, तर एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यापासून थेट अध्यक्षपदापर्यंतच्या बहुतेक पदांसाठी राजकीय नेत्यांचा किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळीचा निवडून येण्याचा प्रयत्न आहे. खेळांच्या संघटनांची निवडणूक कुणी लढवायची आणि मतदारांनी कुणाला निवडून द्यायचं हा त्या त्या संघटनेच्या घटनेचा आणि मतदार सदस्यांचा प्रश्न आहे. पण एक जमाना होता, त्या जमान्यात खेळांच्या संघटनांमध्ये राजकारण्याचं काय काम असा सवाल विचारला जाई. तोवर राजकारण्यांची नजर ही क्रीडा संघटनांच्या अध्यक्षपदावर असायची. पण आता एमसीएच्या निवडणुकीत कोणत्याही पदावर निवडून यायचं तर राजकीय हितसंबंध असायलाच हवेत हे समीकरण रूढ झालेलं दिसतंय. त्यामुळं खेळांच्या संघटनांमध्ये राजकारण्याचं काय काम असा सवाल आता कुणी विचारत नाही.