Sandeep Lamichhane Career : नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर आणि युवा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या विरोधात 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या नावाने अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलं होत. ज्यानंतर आता संदीप लामिछाने याच्या देशाबाहेर जाण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 तिरंगी मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणाऱ्या नेपाळच्या 15 सदस्यीय संघातूनही त्याला वगळण्यात आलं आहे.


संदीप लामिछाने याच्यावर काठमांडू येथील एका हॉटेलच्या खोलीत 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. लामिछाने सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर असून, क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्याने सर्वोच्च न्यायालयात केली होती, जी नाकारण्यात आली आहे.


संदीप लामिछानेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल


सुप्रीम कोर्टाने संदीपच्या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती ईश्वर प्रसाद खतिवडा यांच्या एकल खंडपीठाने गुन्ह्याची गंभीरता अत्यंत घृणास्पद असल्याचं नमूद करुन लामिछाने याच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितले. खतिवडा यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय म्हणतो, “लामिछाने आणि अॅटर्नी जनरल कार्यालयाच्या याचिकांवर एकत्रितपणे विभागीय खंडपीठाकडून सुनावणी घेणे आवश्यक आहे. अॅटर्नी जनरल कार्यालयाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. लामिछाने याला परदेशात जाण्याची परवानगी कधी द्यायची त्याच्याविरुद्धचा तपास सुरु असताना त्याला कोठडीत ठेवण्याची गरज आहे का, याबाबत खंडपीठाने अद्याप निर्णय दिलेला नाही.


आयपीएल खेळणारा एकमेव नेपाळचा क्रिकेटपटू



संदीप लामिछाने नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछाने नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे. विशेष म्हणजे संदीप लामिछानेने सतराव्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. दिल्लीच्या संघाने 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपने आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत. 



हे देखील वाचा-