Rohit Sharma-Virat Kohli: भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आतंरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या रोहित शर्माच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांच्या मनात हा प्रश्न पडतोय की, रोहित शर्माने मैदानावरच निवृत्ती का जाहीर केली नाही?, आता यामागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे.
रोहित शर्माला हे चांगलंच ठाऊक होतं की अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागला तरी विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेणार आहे. भारतीय संघ जिंकल्यावर विराट कोहलीने सामनावीरचा पुरस्कार घ्यायला गेला असताना आपण टी-20 मधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रोहित शर्माने सामन्यानंतर पुरस्कार वितरणात विराट कोहलीला संधी दिली आणि निवृत्तीची घोषणा केली नाही. मात्र, त्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेत रोहित शर्मानेही निवृत्ती जाहीर केली. भारतीय कर्णधाराने आपल्या निवृत्ती आणि कारकिर्दीबद्दलही सांगितले.
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला की, मी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यापेक्षा चांगले काय असू शकते. मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही, मला जे आतून चांगले वाटते तेच मी करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतरही मी हा विश्वचषक खेळू की नाही याचा विचार केला नव्हता. मी टी-20 मधून निवृत्ती घेईन असे कधीच वाटले नव्हते, पण सध्याची परिस्थिती अतिशय योग्य आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती घेणं हा एक अद्भुत अनुभव आहे, असं रोहित शर्माने सांगतिले.
विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करताना काय म्हटलं?
आता नव्या पिढीनं जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक होता. जे मिळवायचं होतं ते मिळालं आहे. एक दिवस तुम्हाला वाटतं की तुम्ही धावा काढू शकत नाही आणि असं होतं. देव महान आहे. फक्त संधी, आताच नाही तर कधी नाही अशी स्थिती होती. भारतासाठी खेळण्याचा टी-20 क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. आम्हाला वर्ल्ड कप उंचावायचा होता, आम्ही तो उंचावला आहे. हे एक खुलं गुपित होतं, मॅच हरलो असतो तरी जाहीर करणार होतो. पुढच्या पिढीनं टी20 क्रिकेट पुढं घेऊन जायची वेळ आली आहे. आमच्यासाठी ही दीर्घकाळ प्रतीक्षा होती. एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी वाट पाहावी लागते. रोहितनं 9 विश्वचषक खेळले आहेत. माझा सहावा विश्वचषक आहे. रोहित आजच्या यशाचा हकदार आहे, असं विराट कोहलीने सांगितले.