Rohit Sharma Mumbai Ranji Team : नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची कामगिरी लज्जास्पद होती. रोहितने 3 सामन्यात फक्त 31 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत रोहित शर्मावर बरीच टीका झाली. आता भारताला पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. रोहित शर्मासाठी स्पर्धेपूर्वी फॉर्ममध्ये येणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी 14 जानेवारी रोजी रोहित शर्मा मुंबई संघासोबत सराव करताना दिसला. पण सध्या त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स दिसत आहे.


यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार...


आता आजपासून म्हणजेच बुधवार 15 जानेवारीपासून दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील मुंबई संघासोबत सराव सत्रात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफी खेळताना दिसू शकतो. तो बुधवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BCK) येथे संघासोबत सराव करेल. मुंबईचा पुढील रणजी सामना 23 जानेवारी रोजी घरच्या मैदानावर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल खेळताना दिसू शकतो. त्याने बीजीटीमध्ये एकूण 391 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.




कामाचा ताण लक्षात घेऊन त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. परंतु आताची परिस्थिती पाहता, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. 23-26 जानेवारी रोजी होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो खेळेल की नाही हे अनिश्चित आहे, परंतु सध्या तो मुंबई संघासोबत सराव करेल. हे 20 जानेवारी रोजी कळेल, जेव्हा मुंबई संघ निवडला जाईल. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. तोही एक-दोन दिवसांत मुंबई संघ व्यवस्थापनाला कळवेल की तो रेड चेंडूचा सामना खेळणार की नाही.


रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स!


मंगळवारी मुंबईत रोहित शर्माने नेटमध्ये सुमारे दोन तास रेड चेंडूने फलंदाजी केली. पण रणजी सामन्यात त्याचे खेळणे अजूनही संशयास्पद वाटते, कारण त्याला इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की रेड चेंडूवरून पांढऱ्या चेंडूवर स्विच करणे सोपे होणार नाही. पण, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत काही वेळ शिल्लक आहे, त्यामुळे ते घरच्या मैदानावर किमान एक रणजी सामना खेळू शकतात.


हे ही वाचा -


Ranji Trophy : टीम इंडियातील खेळाडूंच्या मनमानीला गंभीरने लावला चाप; करिअर वाचवण्यासाठी बड्या खेळाडूंचा मोठा निर्णय