Rohit Sharma Retirement after Sydney Test : बॉर्डर-गावसकर मालिकेत टीम इंडिया आता 1-2 ने पिछाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवला आहे. भारतीय संघाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कायम ठेवण्यासाठी रोहित आणि कंपनीला सिडनीमध्ये कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीचा विचार करता टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे.


दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माबाबत अनेक बातम्या येत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताच्या पराभवानंतर हिटमॅनवर बरीच टीका झाली. चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत त्याला सिडनी कसोटीपूर्वी निवृत्ती घेण्याचा सल्ला देत आहे. मेलबर्न कसोटीनंतर पत्रकार परिषदेत रोहित कसोटीतून निवृत्ती जाहीर करेल, अशी अटकळ बांधली जात होती. तेव्हा त्याने तसे काही केले नाही. पण आता बातमी येत आहे की, सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार आहे. 


काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, रोहित शर्मा लवकरच क्रिकेटच्या कसोटी फॉरमॅटला अलविदा करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित हे घोषणा करताना दिसतील. मात्र, अद्याप त्याच्याकडून किंवा संघ व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अशा परिस्थितीत, आम्हाला अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी लागेल. 


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी रोहितसाठी खुपच खराब राहिली. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांत केवळ 31 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 10 होती. सिडनी कसोटीत तो कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. रोहित जर पायउतार झाल्यास वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भारताचा पुढील कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.


या मालिकेत बुमराह पहिल्या सामन्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या 8 डावात एकूण 30 विकेट घेतल्या आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. त्याच्या आसपास दुसरा कोणताही गोलंदाज नाही. या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज पॅट कमिन्सच्या खात्यात 20 विकेट्सही जमा आहेत.  






हे ही वाचा -


Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री