India vs Australia 5th Test Playing XI : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. या मालिकेतील 4 कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि आता शेवटची आणि पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरू होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीसाठी आपली प्लेइंग-11 जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू मिचेल मार्शला वगळून ब्यू वेबस्टरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 2 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. 31 वर्षीय वेबस्टर 3 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) कसोटी पदार्पण करेल.
मिचेल मार्शचा पत्ता कट?
मिचेल मार्शला वगळण्याचा निर्णय आश्चर्यकारक नाही. 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने चार कसोटी सामन्यांच्या सात डावात 10.42 च्या सरासरीने केवळ 73 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या 73 पैकी 47 धावा पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात आल्या, जेव्हा सामना ऑस्ट्रेलियाच्या हाताबाहेर गेला होता. गोलंदाजीतही मार्शला विशेष काही करता आले नाही. या वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूने पर्थ कसोटीत केवळ 3 विकेट्स घेतल्या, मात्र पुढील तीन कसोटीत तो एकही विकेट घेऊ शकला नाही.
31 वर्षीय आणि 6.5 फूट उंच ब्यू वेबस्टरने आतापर्यंत 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 37.83 च्या फलंदाजीच्या सरासरीने 5,297 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर त्याच्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. तो उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाजी करतो आणि त्याने आतापर्यंत 148 विकेट घेतले आहेत.
मिचेल स्टार्क तंदुरुस्त
कर्णधार पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कला मैदानात उतरण्यासाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान स्टार्कला त्याच्या पाठ दुखत होती. त्यामुळे शेवटच्या कसोटीत खेळणे त्याच्यासाठी अवघड वाटत होते, पण आता स्टार्क सिडनी कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल हे स्पष्ट झाले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
हे ही वाचा -