Rohit Sharma India vs Australia : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळला जात आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. गाबा कसोटीत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला.




चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण नंतर तीच जुनी चूक करत त्याने त्याची विकेट गमावली. ॲडलेड कसोटीत रोहित ज्याप्रकारे बाद झाला, तसंच काहीसं गाबामध्येही पाहायला मिळालं. यानंतर रोहितवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




रोहितचा फ्लॉप शो सुरूच 


ॲडलेड कसोटीनंतर रोहित शर्माही गाबामध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला, पण रोहितला ना सलामीला चांगली फलंदाजी करता आली ना मधल्या फळीत. चौथ्या दिवशी रोहित अवघ्या 10 धावा करून बाद झाला. पुन्हा एकदा पॅट कमिन्सने रोहितची विकेट घेतली. आता यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि त्याला टी-20 नंतर  कसोटीतून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला.


या मालिकेत रोहित पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. पण रोहितला ॲडलेड ओव्हलवरील दुसऱ्या कसोटीत केवळ 3 आणि 6 धावा करता आल्या. आता तो 10 धावा करून बाद झाला. गेल्या 13 कसोटी डावांमध्ये रोहितला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. त्याच्या धावा 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10 आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2024-25 च्या मोसमात पहिल्या डावात रोहितची सरासरी केवळ 8.85 होती.  




कमिन्सने चौथ्यांदा केली रोहितला शिकार 


कमिन्सने चौथ्यांदा कसोटीत कर्णधार रोहित शर्माची विकेट घेतली. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा विरोधी कर्णधाराला बाद करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉड आणि इम्रान खान यांनी प्रत्येकी 5 वेळा ही कामगिरी केली आहे.




रिची बेनॉडने इंग्लंडचा माजी कर्णधार टेड डेक्सटरला 5 वेळा बाद केले होते. तर पाकिस्तानच्या इम्रान खानने सुनील गावसकरला 5 वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. रिची बेनॉडने माजी भारतीय कर्णधार गुलाबराय रामचंदला 4 वेळा तर कपिल देवने वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडला 4 वेळा आता पॅट कमिन्सने 4 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. हे संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 


हे ही वाचा -


संघाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान खेळाडूने अचानक घेतली तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला....