ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं होऊ शकला नाही. भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी ऐवजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो चुकीचा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेडनं शतकी खेळी करत भारताला बॅकफूटवर ढकललं. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या. तर, भारताची स्थिती 4 बाद 48  अशी झाली आहे. भारताच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीसाठी रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे.


पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी टीम इंडियाच्या रणनीती आणि कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर भारताच्या या कामगिरीला रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचं म्हटलं. श्रीलंका विरुद्धची एकदिवसीय मालिका, न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात समन्वय दिसून आला नाही. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यात तसं दिसत नव्हतं, ते दोघे एकत्रितपणे काम करायचे, असं बासित अली म्हणाले. 


भारताच्या संघ निवडीवर आणि रणनीतीवर देखील बासित अली यांनी प्रश्न उपस्थित केले. ऑस्ट्रेलियाच्या संघात तीन डावखुरे फलंदाज असताना भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विन  या सारख्या ऑफ स्पिनरला संघात का स्थान दिलं नाही, असा सवाल बासित अली यांनी केला. वॉशिंग्टन सुंदर अन् अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला स्थान दिलं पण तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरल्याचं देखील बासित अली म्हणाले. 


भारतीय संघ पूर्णपणे जसप्रीत बुमराहवर अवलंबून राहिला आहे. इतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नाही. याशिवाय भारतीय संघात डावखुरा गोलंदाज नसणं ही देखील समस्या असल्याचं बासित अली म्हणाले.


भारतीय क्रिकेट संघानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो महागात पडला. रोहित शर्मानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो चुकीचा ठरला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया गेला. तर, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ  आणि ट्रॅविस हेडनं 241 धावांची भागिदारी केली. 


तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी गडगडली. शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत हे मोठी खेळी करु शकले नाहीत. केएल राहुल नाबाद 30  धावा करुन मैदानात आहे. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी भारतीय संघाचा डाव सावरतात का हे पाहावं लागेल. 


इतर बातम्या :


 गंजलेली रनमशीन! विराट कोहली नेमकं कुठे चुकतोय? गावसकरांनी घात करणारा 'तो' शॉट सोडण्याचा दिला सल्ला