Ankit Rajpoot Retirement : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशकडून खेळणारा 31 वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2009 मध्ये सुरू झालेल्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट त्याने केला. अंकितने आपल्या कारकिर्दीत 80 प्रथम श्रेणी सामने खेळले. याशिवाय तो आयपीएलचे 6 हंगाम खेळला.
अंकितने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाला हा मोठा धक्का असू शकतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आज कृतज्ञता आणि नम्रतेने मी भारतीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. 2009 ते 2024 हा माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत काळ होता. बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, कानपूर क्रिकेट असोसिएशन, आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे.
पुढे, अंकितने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्याचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, फिजिओ, चाहते आणि कुटुंबीयांचे आभार मानले. अकितला त्याच्या करिअरमध्ये टीम इंडियाकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. तो भारत अ संघाकडून क्रिकेट खेळला, पण वरिष्ठ संघापर्यंत पोहोचू शकला नाही.
अंकित राजपूतची कारकीर्द
अंकितने आपल्या करिअरमध्ये 80 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 87 टी-20 सामने खेळले. 137 प्रथम श्रेणी डावांमध्ये, त्याने 29.25 च्या सरासरीने 248 विकेट्स घेतल्या. याशिवाय अंकितने लिस्ट-ए च्या 49 डावांमध्ये 26.94 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या. टी-20 च्या उर्वरित 87 डावांमध्ये अंकितने 21.55 च्या सरासरीने 105 विकेट घेतल्या.
अंकितने 2013 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. तो 2020-21 च्या मोसमापर्यंत आयपीएल खेळला. या काळात अंकित चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. अंकितने आयपीएलचे एकूण 29 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 29 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 33.91 च्या सरासरीने 24 बळी घेतले.
हे ही वाचा -