मुंबई:भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी आहे. या दरम्यान देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना ( Domestic Cricket) सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू 5 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या दिलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) देखील दिलीप ट्रॉफी खेळण्याची शक्यता आहे. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत चार संघ खेळतील. यामध्ये ए.बी.सी.डी अशी नावं या संघांना दिली जाणार आहे.
रोहित शर्मा किती वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणार?
रोहित शर्मा दिलीप ट्रॉफीत सहभागी झाल्यास तो तब्बल 8 वर्षांनतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेल. यापूर्वी रोहितनं 2016 मध्ये दिलीप ट्रॉफीत खेळला होता. रोहित शर्मा त्यावेळी इंडिया ब्ल्यू संघाकडून खेळला होता. रोहितनं त्यावेळी पहिल्या डावात 30 तर दुसऱ्या डावात नाबाद 32 धावा केल्या होत्या. इंडिया ब्ल्यूनं तो सामना 355 धावांनी जिंकला होता.
गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात खेळलेला रोहित शर्मा
रोहित शर्मा दिलीप ट्रॉफी 2016 मध्ये इंडिया ब्ल्यू संघाकडून गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात खेळला होता. सध्या रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे तर, गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. गौतम गंभीरनं त्या मॅचमध्ये पहिल्या डावात 94 तर दुसऱ्या डावात 32 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माची प्रथमश्रेणी कारकीर्द
रोहित शर्मानं त्याच्या करिअरमध्ये 120 सामने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्यानं 9123 धावा केल्या आहेत. या दरम्यान रोहितनं 29 शतकं आणि 37 अर्धशतकं केली आहेत. रोहित शऱ्मा करिअरच्या सुरुवातीला लेग स्पिन गोलंदाजी करायचा. रोहित शर्मानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, रोहित शर्मा प्रमाणं विराट कोहली देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सूर्यकुमार यादवनं देखील मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं टीम इंडियातील दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असल्यानं प्रेक्षकांचा देखील या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या