Virat Kohli And Rohit Sharma Likely to Play 2024 Duleep Trophy: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज 2024 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली आणि रोहित सर्मा बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेले नाहीत. अशा स्थितीत टीम इंडियाचे हे दोन दिग्गज खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत खेळणे आश्चर्यकारक आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)ने दुलीप ट्रॉफीच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ही स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार नाही. यामध्ये फक्त चार संघ असतील. या संघांची अद्याप घोषणा झालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया-सी आणि इंडिया-डी असे चार संघ खेळतील.
5 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार-
दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील फेरीपासून ही स्पर्धा खेळू शकतात. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू दुलीप ट्रॉफीत भाग घेणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 12 सप्टेंबरपासून होणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
इशान किशनही दुलीप ट्रॉफीत खेळण्याची शक्यता-
एका वृत्तानूसार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. इशान किशन जवळपास दीड वर्षांपासून टीम इंडियाचा भाग नाही. यानंतर बीसीसीआयने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. पण आजारपणामुळे तो खेळला नाही, मात्र काही दिवसांनी आयपीएलसाठी सराव करताना दिसला. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने कसोटी संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना यात सूट मिळाल्याची बातमी आली होती. मात्र आता बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचं समोर येत आहे.
बांगलादेशविरुद्ध कशी असेल मालिका?
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे.