Rohit Sharma Birthday Special : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस आहे. 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर येथे रोहित शर्माचा जन्म झाला होता. रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या तिन्ही संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदा मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.  गुणतालिकेत मुंबईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईला सात सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएलचा चषक चारवेळा उंचावलाय.  त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावलेय. 


सलामी फलंदाज झाल्यानंतर बदलले नशीब - 


रोहित शर्मा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 मध्येच संधी मिळाली. पण सुरुवातीच्या काळात रोहित शर्मा याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मध्यक्रमला फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला संघात स्थान टिकवता आले नव्हते. वारंवार संघाबाहेर जात होता. पण 2013 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं रोहित शर्मा याला सलामीला संधी दिली. तेव्हापासून रोहित शर्मा याच्या करिअरला नवी दिशा मिळाली. रोहित शर्मा 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा सलामीला उतरला होता. त्यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिलेच नाही. रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू आहे.  


वनडेमध्ये तीन द्विशतके - 


सलामीला संधी मिळाल्यानंतर रोहित शर्मा याच्या कामगिरीत सातत्य आले. रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मा याने वनडे मध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने अनेक मुलाखतीत त्यासाठी धोनीच्या नावाचा उल्लेख केला आहे. धोनीने सलामीला पाठवल्यामुळेच खेळात सातत्य आल्याचे सांगण्यात येते. रोहित शर्माने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पहिले द्विशतक झळकावले होते. रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 264 इतकी आहे. रोहित शर्माने 2014 मध्ये श्रीलंकाविरोधात 264 धावांचा पाऊस पाडला होता. एकदिवसीयच नव्हे तर रोहित शर्मा याने टी 20 क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस पाडला आहे. टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने चार शतके झळकावली आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे. मर्यादीत षटकाच्या क्रिकटमध्ये रोहित शर्माला विस्फोटक सलमी फंलदाज म्हणून ओळखले जाते. इंग्लंडमध्ये 2019 ला झालेल्या वनडे विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतकांची रांग लागली होती.