Rohit Sharma Virat Kohli Retirement T20I Cricket बारबाडोस : भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024) विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील ट्विट केलं आहे.
पीटीआयचं ट्विट
विराट अन् रोहित निवृत्त
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. तब्बल 17 वर्षानंतर भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयासह भारतीय क्रिकेटमधील दोन महान क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतरच निवृत्तीचे संकेत दिले होते. रोहित शर्मानं यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना म्हटलं की गुड बाय म्हणण्यासाठी आताच्या सारखी चांगली वेळ नाही. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर होतो. आम्ही ती रेषा पार केली आहे त्यामुळं आनंद होतोय, असं देखील रोहित शर्मानं म्हटलं.
रोहित शर्मानं भारतासाठी 159 आंतराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये क्रिकेट खेळलं. यामध्ये 32.05 च्या सरासरीनं त्यानं 140.89 च्या स्ट्राइक रेटनं 4231 धावा केल्या. रोहित शर्माच्या नावावर आंतरारष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टीमध्ये 5 शतकांची तर 32 अर्धशतकांची नोंद आहे. रोहित शर्मा 2007 आणि 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आहे.
विराटनं निवृत्ती जाहीर करताना काय म्हटलं?
आता नव्या पिढीनं जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप होता. जे मिळवायचं होतं ते मिळालं आहे. एक दिवस तुम्हाला वाटतं की तुम्ही धावा काढू शकत नाही आणि असं होतं. भगवान महान आहे. फक्त संधी, आताच नाही तर कधी नाही अशी स्थिती होती. भारतासाठी खेळण्याचा टी 20 क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. आम्हाला वर्ल्ड कप उंचावायचा होता, आम्ही तो उंचावला आहे. हे एक खुलं गुपित होतं, मॅच हरलो असतो तरी जाहीर करणार होतो. पुढच्या पिढीनं टी20 क्रिकेट पुढं घेऊन जायची वेळ आली आहे. आमच्यासाठी ही दीर्घकाळ प्रतीक्षा होती. एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी वाट पाहावी लागते. रोहितनं 9 वर्ल्ड कप खेळले आहेत. माझा सहावा वर्ल्ड कप आहे. रोहित आजच्या यशाचा हकदार आहे, असं विराट कोहली म्हणाला.